आमीर खान याचा ४७ वा वाढदिवस साजरा

मुंबई, दि. १४- बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता आमीर खानने बुधवारी आपला ४७ वा वाढदिवस साजरा केला. १९७३ मध्ये आमीर खानने आपले काका नासिरूद्दीन हुसेन यांच्यासोबत बाल कलाकार म्हणून काम केले होते. त्यानंतर सुमारे ११ वर्षांनंतर त्याने ’होली’ या चित्रपटातून आपल्या मुख्य कारकिर्दीची सुरूवात केली. १९८८ मधील ’कयामत ये कयामत तक’ या चित्रपटाने तर त्याला बॉलिवूडमधील स्टार बनवले. तसेच या चित्रपटासाठी त्याला सर्वश्रेष्ठ नवोदित पुरूष कलाकार हा पुरस्कार मिळाला. त्यानंतर मात्र त्याने मागे वळून पाहिले नाही.
  आमीर खानने ’राजा हिंदुस्थानी’ या चित्रपटातून पहिला फिल्म फेअर सर्वश्रेष्ठ अभिनेता पुरस्कार मिळवला. त्यानंतर ’लगान’, ’दिल चाहता है’, ’रंग दे बसंती’, ’तारे जमीं पर’, ’सरफरोश’, ’गझनी’, ’थ्री इडियट्स’ आदी चित्रपटांनी तर त्याला यशाच्या शिखरावरच नेऊन पोहोचवले. आमीर खानचे एका वर्षात एक किवा दोन निवडक चित्रपट येतात. या वर्षी देखील त्याचा ’तलाश’ नावाचा एक चित्रपट प्रदर्शित होणार आहे, ज्यात त्याने एका पोलीसाची भूमिका साकारली आहे. वाढदिवसाच्या दिवशीही त्याने या चित्रपटाच्या चित्रीकरणास हजेरी लावून, त्याच्या चाहत्यांना व सहकार्‍यांनाही धक्का दिला.

Leave a Comment