राहुल द्रविडचा क्रिकेटला अलविदा

    बंगलोर, दि. ९ – आपल्या झुंजार वृत्तीमुळे ‘वॉल’ या नावाने जगप्रसिध्द असलेला भारताचा आघाडीचा आणि भरवशाचा फलंदाज राहुल द्रविड याने आज आंतरराष्ट्रीय आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा एका भरगच्च पत्रकार परिषदेत केली. पत्रकार परिषदेला राहुल द्रविड सोबत बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन आणि भारताचा फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे उपस्थित होते.
भारतातील उदयोन्मुख आणि होतकरु खेळाडूंना म्हणजेच नव्या रक्ताला भारतातर्फे खेळायला संधी मिळायला हवी असे सांगत राहुल द्रविडने आज आंतरराष्ट्रीय आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. गतवर्षी इंग्लंड दौर्‍यानंतर ३९ वर्षीय राहुलने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्या दौर्‍यात राहुल जोरात फॉर्मात होता. त्याने लाजवाब तीन शतकेही झळकवली होती. याच पार्श्वभूमीवर इंग्लंडविरुध्दच्या एकदिवसीय मालिकेसाठी राहुलची आश्चर्यकारकरित्या निवड करण्यात आली होती.
पत्रकार परिषदेत यावेळी राहुलने गेल्या १७ वर्षाच्या कारकीर्दीत संघातील सहकार्‍यांचे, प्रशिक्षक, फिजिओंचे, कर्णधार, निवड समितीचे आणि क्रिकेट रसिकांचे भरभरुन आभार मानले. निवृत्तीचा निर्णय घेणे मला कठिण जात होते. परंतु निवृत्तीसाठी हीच वेळ योग्य असल्याचे मला पटल्याने मी हा निर्णय घेतला. प्रत्येक टीकेतून आणि स्तुतीतून मी आजपर्यंत शिकत आलो आहे. १६ वर्षाच्या कारकीर्दीत चढउतार येणारच परंतु माझ्या प्रयत्नात मी कधीही कसूर केली नाही, अशी प्रतिक्रिया राहुलने व्यक्त केली.
दरम्यान, लॉर्ड्सवर १९९६ मध्ये पदार्पण करणार्‍या राहुलने १६४ कसोटी सामन्यात देशाचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्याच्या नावावर ५२.३१ च्या सरासरीने १३,२८८ धावा जमा आहेत. सचिनच्या खात्यावर १८८ कसोटी सामन्यात सर्वाधिक १५,४७० धावा जमा आहेत. त्यानंतर द्रविडचा क्रमांक लागतो. ३४४ एक दिवसीय सामन्यात राहुलने १०,८८९ धावा केल्या आहेत.
बीसीसीआयच्या वतीने राहुलचा यशोचित सन्मान केला जाईल असे सांगून राहुलने करियरला साजेशी खेळी केल्याचे कौतुक बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी यावेळी केले. तसेच राहुलच्या जागेवर पर्यायी खेळाडू मिळणे अशक्य असल्याचे श्रीनिवासन यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment