पुणे मुंबई महामार्ग व गोवामहामार्ग झाले आहेत मृत्यूचे सापळे

पुणे दि.३-पुणे मुंबई द्रुतगती महामार्ग आणि मुंबई गोवा महामार्ग या राज्यातील दोन महत्त्वाच्या महामार्गांवर गेल्या चार वर्षात मृत्यूने जणू थैमान घातले असून या महामार्गांच्या लांबीच्या प्रमाणात प्रत्येक किलोमीटरला एक मृत्यू असे त्याचे प्रमाण बनले असल्याचे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
     हे दोन महामार्ग म्हणजे जणू किलर रोडच बनले असून २००८ ते फेब्रुवारी २०१२ या काळात या दोन्ही महामार्गावर तब्बल १४०० जणांना प्राण गमवावे लागले आहेत. नवीन आकडेवारीनुसार मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर २००९ सालपासून आत्तापर्यंत ३७० जण ठार झाले असून ६९७ जण गंभीर जखमी झाले आहेत. या रस्त्यावर या काळात १४५७ अपघात झाले आहेत. तर मुंबई गोवा या ५५० किमीच्या महामार्गावर २००८ सालापासून आत्तापर्यंत ५३७० अपघातात १०४२ जणांचे प्राण गेले आहेत तर ३२३२ जण गंभीर जखमी झाले आहेत.
  वरीष्ठ वाहतूक पोलिस अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार या रस्त्यावरचे अपघात कमी व्हावेत यासाठी केंद्राने कंत्राटदारांना कांही ठिकाणचा अरूंद रस्ता रूंद करण्याचे आदेश दिले आहेत तर राज्य शासनाने बोरघाटातून पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याचे काम हाती घेतले आहे. या मुळे या मुख्य रस्त्यावरचा वाहनांचा ताण कमी होऊ शकणार आहे.
  मुंबई गोवा महामार्गावर बर्‍याच ठिकाणी तीव्र वळणे आहेत मात्र रस्त्यावर दुभाजक नाहीत. छोट्या जीप्स, कार्ससारखी वाहने चालक बेदरकारपणे चालवून दुसर्‍या वाहनांना ओव्हरटेक करतात  आणि त्यातून होणार्‍या अपघातांची संख्याच लक्षणीय असल्याचे वाहतूक पोलिस अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. दुसरे म्हणजे या महामार्गावर आत्पतकालीन रूग्णालयांची संख्या कमी आहे त्यामुळे अपघातग्रस्तांना बरेचवेळा शेजारच्या खेड्यातील रूग्णालयात न्यावे लागते त्यातही गंभीर जखमींचे प्राण जाण्याची शक्यता वाढते.
   मुंबई पुणे हा यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग भारतातील पहिला सहापदरी महामार्ग असून ९३ किमीचा हा रस्ता अतिवेगवान महामार्ग आहे. त्यामुळे मुंबई पुणे अंतर अवघ्या दोन तासात पार करणे शक्य झाले आहे. या महामार्गावर प्रवासी वाहनांना वाहतूक कोंडी अथवा अपघात झाल्याची सूचना मिळावी व वेळीच त्यांना अन्य पर्यायी मार्गाचा अवलंब करता यावा म्हणून सूचना देणारे इलेक्टॉनिक डिसप्ले बोर्ड बसविण्यात आले असल्याचेही वाहतूक पोलिस अधिकार्‍यांनी सांगितले.

Leave a Comment