चैत्री एकादशी सोहळ्यासाठी पंढरीत दोन लाख भाविक दाखल

पंढरपूर,दि. ३ – चैत्री एकादशी सोहळ्यासाठी पंढरीत दोन लाखाहून अधिक भाविक दाखल झाले असून पथदर्शन रांगेत ८० हजार भाविक उभे आहेत. उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे भाविकांना उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे. चैत्री एकादशी सोहळ्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून पंढरीत भाविकांची संख्या वाढू लागली असून हरी नाम व हर हर महादेव गजराने पंढरी नगरी दुमदुमुन गेली आहे.
  पंढरीत आलेले भाविक चंद्रभागा नदीमध्ये पवित्र स्नान करून श्रीविठ्ठलाच्या पथदर्शनासाठी उभे राहू लागले आहेत. पथदर्शन रांग श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज दर्शन मंडप भरून पंचमुखी मारूतीपर्यंत पोहचली आहे. दर्शनासाठी ५ ते ७ तास लागत आहेत. भाविक कावड घेवून येत आहेत. कावडीस चंद्रभागा नदीमध्ये स्नान घालून पाणी घेवून शिखर शिंगणापूरकडे जात आहेत. उन्हाची तीव्रता अधिक असल्यामुळे पाण्यासाठी भाविकांना वणवण भटकावे लागत आहे. प्रदक्षिणा मार्गावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे. तहान भागविण्यासाठी भाविक लिंबू सरबत, ज्युस, ऊस रसपानगृहाकडे वळत आहेत.
  यात्रेवर लक्ष ठेवण्यासाठी एक हजार पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अतिरेकी कारवायाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात भाविकांची तपासणी करून सोडण्यात येत आहे. मंदिर परिसरात श्वान पथक, बॉम्ब शोधक पथकाकडून तपासणी करण्यात येत आहे. भाविकांना सोयीसुविधा देण्यासाठी नगरपरिषदेने यंत्रणा सज्ज ठेवली आहे. भाविकांच्या स्नानासाठी चंद्रभागा नदीमध्ये पाणी सोडण्यात आले आहे.
     नळाचे पाणी हॉटेल व्यवसायिकांनी पळविले…
चंद्रभागा वाळवंटामध्ये भाविकांना पिण्याचे पाणी मिळावे म्हणून नगरपरिषदेने ५० नळ उभे केले आहेत. मात्र या नळाचा उपयोग वाळवंटामध्ये उभे करण्यात आलेले हॉटेल व्यवसायिक करत आहेत. नळाला पाईप लावून हॉटेलमध्ये पाणी घेतले आहे. त्यामुळे भाविकांना पाणी मिळविण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. याकडे न. प. कर्मचार्‍यांचे दुर्लक्ष आहे.
     गरोदर महिलेस मंदिरातील कमांडोजने ढकलले…
श्रीविठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या गरोदर महिला भाविक रा.मुंबई या महिलेस खासगी कमांडोजने ढकलल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी मंदिर समितीकडे तक्रार दाखल केली आहे. गरोदर महिलेला कमांडोजने ढकलाढकली करू नये अशी मागणी त्यांनी केली. या प्रकारामुळे मंदिरात खळबळ उडाली.

Leave a Comment