नागपूर, दि. ३ – नागपूरच्या पाच प्रवाशांना निम्न दर्जाची सेवा देण्याचा ठपका ठेवीत या पाचही जणांच्या तिकिटाची एकूण ६ लाख १९ हजार रुपयांची रक्कम ऑस्ट्रीयन एअरलाईन्सने परत द्यावी, असा आदेश राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिला आहे. आयोगाचे अध्यक्ष एस. एम. शेंबोळे यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. पाचही जण कळमेश्वरच्या इस्पात इंडस्ट्रीज लि. मध्ये कार्यरत आहेत. कोसोवो येथे प्रिस्टाईनजवळच्या एका पोलाद कंपनीला व्यावसायिक सल्ला देण्यासाठी या अधिकार्यांना पाचारण केले होते.
या पाचही अधिकार्यांनी प्रत्येकी एक लाख २४ हजार या दराने ऑस्ट्रीयन एअरलाईन्सची तिकिट बुक केली होती. आठ तासांच्या प्रवासानंतर ते व्हिएन्ना येथे पोचले. परंतु पुढील प्रवासासाठी एअरलाईन्सने आवश्यक कागदोपत्री प्रक्रिया करण्यास नकार दिला. तुमच्याजवळ पुढील प्रवासासाठी वैध दस्तावेज नाहीत, असे कारण सांगून काहीही न ऐकता संबंधिताना वार्यावर सोडून दिले. व्हिएन्नात ३० तास वाया गेल्यानंतर त्यांना भारतात परत यावे लागले. त्यामुळे कोसोवोला ते पोचूच शकले नाहीत.
ऑस्ट्रीयन एअरलाईन्सच्या या वागणुकीमुळे मनःस्ताप झालेल्या या पाचही अधिकार्यांनी राज्य ग्राहक निवारण आयोगाकडे तक्रार दाखल केली. विमान कंपनीने आम्हाला अतिशय वाईट आणि दुर्लक्षितपणाची वागणूक दिल्यामुळे आम्हाला तिकिटांची रक्कम परत मिळाली आणि आम्हाला जो मनःस्ताप झाला त्याची नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी या तक्रारीतून करण्यात आली होती. राज्य ग्राहक न्यायालयाने विमान कंपनीवर निम्न दर्जाची सेवा देण्याचा ठपका ठेवीत तिकिटांची ६ लाख १९ हजार ६८० रुपये एवढी रक्कम या पाचही अधिकार्यांना द्यावी, असा आदेश दिला.