सुवर्णगणेश चोरी प्रकरणी विधानसभेत गदारोळ; युतीचे १४ आमदार १ वर्षासाठी निलंबीत

मुंबई, दि. ३०  – विधानसभेत बेशिस्त, अशोभनीय वर्तन करुन सभागृहाचा विशेषाधिकार भंग आणि अवमान केल्याचा आरोप करीत शिवसेनेच्या १३ तर भाजपाच्या एका सदस्याला एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले. चौदा विरोधीपक्ष सदस्यांना निलंबित करण्याचा हा ठराव विधानसभेत शुक्रवारी आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला. मात्र लगेचच, या निलंबनानंतर सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
  प्रश्नोत्तराच्या तासानंतर युतीच्या काही सदस्यांनी सभागृहात गणेश मूर्ती आणून घोषणा दिल्या. झांजा वाजवून आरती करण्याचा प्रयत्न केला. भगवे उपरणे, टोप्या घालून आलेल्या सदस्यांनी ‘गणपती गेले चोरीला, लाज नाही सरकारला‘ अशा घोषणा देण्याचा प्रयत्न केला. अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यानी प्रथम अर्धा तास सभागृह तहकूब केले. यावेळी नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांची विनोद घोसाळकर आणि काही सेना सदस्यांशी शाब्दिक चकमक झाली.
  कामकाज पुन्हा सुरु होताच गदारोळालाही सुरुवात झाली. राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी गणपती हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. त्यांची अशा प्रकारे अवमानना करणे योग्य नाही, असे सांगत या सदनात नियमाने कामकाज चालले पाहिजे. त्याऐवजी अशाप्रकारे कामकाज करण्याची चुकीची प्रथा पाडणे हा सदस्यांचा आणि सार्वभौम सदनाचा अवमान आहे, असा मुद्दा मांडला. सदनाची शिस्त मोडणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी केली. यावेळी उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके यांनी सदस्यांना जागेवर जाण्याचे तसेच नियमाने कामकाजात सहभागी होण्याची विनंती केली मात्र गदारोळ शांत होत नव्हता तेव्हा एक तास कामकाज तहकूब करण्यात आले.
  पुन्हा कामकाज सुरु झाले तेव्हा विधानकार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सभागृहात विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अशोभनीय, बेशिस्त वर्तन करुन सभागृहच्या विशेषाधिकाराचा  भंग आणि अवमान केल्याचा तसेच संबधितांना एक वर्षासाठी सदनातून निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला. तो आवाजी मतदानाने मंजूर केला जात असताना पुन्हा विरोधी सदस्यांनी सदनात गदारोळ केला. तेव्हा कामकाज दिवसभराकरीता तहकूब करण्यात आले.
  निलंबीत सदस्यांची नावे पुढीलप्रमाणेः प्रताप सरनाईक (ओवळा-माजीवडा), महादेव बाबर (हडपसर), विजय शिवतारे (पुरंदर), एकनाथ शिंदे (कोपरी -पाचपाखाडी), विनोद घोसाळकर (दहिसर), राजन विचारे(ठाणे शहर), ज्ञानराज चौगुले (उमरगा), संजय गावंडे (आकोट), बालाजी किणीकर(अंबरनाथ), कॅ. अभिजीत अडसूळ(दर्यापूर), डॉ. सुजीत मिणचेकर(हातकणंगले), चंद्रकांत मोकाटे(कोथरुड), दौलत दरोडा(शहापूर) हे शिवसेना सदस्य तर प्रा. राम शिंदे (कर्जत -जामखेड) हे भाजपाचे सदस्य आहेत.

Leave a Comment