पुणे, दि. २९ – प्रवासी वाहतूक करणार्या रिक्षाचालकांच्या गळ्यात आता अधिकृत ओळखपत्र दिसणार आहे. तसेच त्यांना माहितीपत्रक बाळगावे लागणार आहे. महिनाभरात या ओळखपत्राची सक्ती लागू होणार असून, त्याकडे दुर्लक्ष केल्यास चालकाचे लायसन्स ताब्यात घेतले जाणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
भाडे नाकारणे, जादा भाडे आकारणे आणि प्रवाशांबरोबर गैरवर्तन करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. टॅक्सी आणि कॅबमधून ये-जा करणार्या प्रवाशांची फसवणूक होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तसेच गेल्या तीन ते चार वर्षांत आयटी कंपन्यांमधील कर्मचार्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे. विशेषतः महिलांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर टॅक्सी आणि रिक्षाचालकांसाठी माहितीपत्रक बंधनकारक करण्यात आले आहे. चालकाचे नाव, पत्ता, वाहन, लायसन्स आणि बॅज नंबर याचा ओळखपत्रावर उल्लेख करण्यात येणार आहे. तसेच तक्रार नोंदविण्यासाठी आरटीओने सुरू केलेला टोल फ्री नंबर, हेल्पलाइन, वाहतूक पोलीस आणि पोलीस आयुक्तालयाच्या नंबरचा माहितीपत्रकात उल्लेख असेल.
प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अशा प्रकारचे ओळखपत्र आणि माहितीपत्रक तयार करण्यात येणार आहे. त्याचा नमुना तयार झाला असून, यासंदर्भात जिल्हा परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत अंतिम प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. ओळखपत्राच्या निर्णयाच्या अंमलबजाणीची पूर्वतयारी झाली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील रिक्षांना ओळखपत्र आणि माहितीपत्रकाची सक्ती लागू केली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
