मुंबई, दि. २९ – अमेरिकेमध्ये नोकरी किवा व्यवसाय करणा-यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणा-या एच-१ बी या व्हिसासाठी भारतीयांना जादा पैसे खर्च करावे लागणार आहेत. अमेरिकेने नोकरीसाठी वापरण्यात येणा-या या व्हिसाच्या शुल्कात मोठी वाढ केली आहे. त्यामुळे आधीच जाचक असलेल्या अमेरिकन व्हिसासाठी भारतीयांना जादा खर्चाचा भार सहन करावा लागणार आहे. याचा सर्वाधिक फटका माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांना बसण्याची शक्यता आहे.
पन्नास किवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी असणा-या अर्जदार कंपनींना भराव्या लागणा-या शुल्कामध्ये भरमसाठ वाढ करण्यात आली आहे. एच-१ बी हा व्हिसा पुढच्या वर्षीसाठी चांगलाच महाग झाला असून या व्हिसासाठी आता ३२५ डॉलर्स ते २००० डॉलर्स शुल्कापोटी भरावे लागणार आहेत. चालू वर्षामध्ये २५ कर्मचारी असणा-या अर्जदारांसाठी ७५० डॉलर्स एवढे शुल्क आकारण्यात आले होते. तर २६ किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचा-यांसाठी १५०० डॉलर्स शुल्क स्विकारले होते. तसेच घोटाळे टाळण्यासाठी आणि त्यांच्या तपासासाठीही अतिरिक्त ५०० डॉलर्सची शुल्क वसुली करण्यात येणार आहे. पंधरा दिवसात अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची असेल तर १२२५ डॉलर्स अतिरिक्त भरावे लागणार आहेत. भारतातील सॉफटवेअर व सेवा क्षेत्रातील कंपन्या ६० टक्क्यांपर्यंत उत्पन्न हे अमेरिकेतून मिळवितात. तसेच या ठिकाणीही मोठया प्रमाणावर आयटी प्रोफेशनल्सची नेमणूक करत असल्यामुळे या कंपन्यांना महागलेल्या व्हिसाची मोठी झळ बसणार आहे.
व्हिसाचे अर्ज २ एप्रिलपासून स्विकारण्यास सुरूवात होणार आहे. १ ऑक्टोबरला सुरू होणा-या आर्थिक वर्षासाठी हा व्हिसा असणार आहे. भारतामधील माहिती-तंत्रज्ञान व्यावसायिकांसाठी अमेरिका सर्वात मोठी बाजारपेठ असल्याने हा व्हिसा त्यांच्यासाठी जिव्हाळयाचा विषय असतो.
गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही ६५ हजार व्हिसांची मर्यादा ठरविण्यात आली आहे. अमेरिकेतील पदव्युत्तर पदवी असणा-या व्यक्तींकडून प्रथम येणा-या २० हजार अर्जांना आर्थिक वर्षाच्या मर्यादेतून वगळण्यात आले आहे. अमेरिकेची सिटीजनशिप अॅण्ड इमिग्रेशन सेर्विसेसने सांगितले की, मुदतीमध्ये निश्चित शुल्कासह योग्य प्रकारे भरलेल्या अर्जांचाच विचार करण्यात येईल. अर्जावरील तारीख यासाठी ग्राहय धरली जाणार नाही. तसेच मर्यादेपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास लॉटरी पद्धतीने अर्जांची निवड करण्यात येणार आहे. उच्च शिक्षण संस्थेमध्ये किवा नॉन प्रॉफिट रिसर्च ऑर्गनायझेशन किंवा गव्हर्नमेंट रिसर्च ऑर्गनायझेशनमध्ये काम करणा-या व्यक्तींना वार्षिक मर्यादेतून वगळण्यात आले आहे. तसेच अर्जदारांनी दोन अर्ज टाळण्याची काळजी घ्यावी असेही सांगण्यात आले आहे.