मुंबईतील चोरट्याला सोलापूरमध्ये मुद्देमालासह अटक

सोलापूर, दि. २८ – नवी मुंबईमध्ये पायी चालत जाणार्‍याला अडवून मारहाण करीत त्याच्या जवळील सोनसाखळी जबरदस्तीने चोरणार्‍या चोरट्याला नुकतीच झोन पथकाच्या पोलिसांनी सोलापूरमध्ये अटक केली आणि त्याच्याजवळून १२ हजार ६०० रूपयांचा ऐवज जप्त केला.
 संतोष ऊर्फ संत्या हरी चव्हाण (२६, रा. तुर्भे स्टोअर के. के. आर. रोड, नवी मुंबई, हल्ली गणेश तांडा, देगांव रोड सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. विकास सुधाकर भुपी  (३८, रा. नेरळ गाव, हनुमान मंदिर जवळ, नवी मुंबई ) हे त्यांचे काम संपवून तुर्भे स्टोअर रूमच्या डंपिग मैदानाच्या बाजूच्या रस्त्यावरून पायी चालत जात असताना दोघे अनोळखी इसम समोर आले तू कुठे चालला आम्हाला खर्चासाठी पैसे दे असे म्हणून त्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. त्याचवेळी गळ्यातील १० ग्रॅमची सोन्याची चेन जबरदस्तीने काढून घेतली. त्यादरम्यान जमलेल्या लोकांनी सांगितल्यावरून संतोष ऊर्फ संत्या हरी चव्हाण आणि योगेश ऊर्फ योग्या चांगदेव राठोड असे दोघांचे नावे असल्याचे समजले, अशी फिर्याद विकास भुपी यांनी तुर्भे पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून वरील दोघां चोरट्यांविरूध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला. नंतर वरील पैकी एक चोरटा सोलापूरमध्ये गणेश तांड्यावर असल्याची माहिती तुर्भे पोलिसांनी पोलीस उपायुक्त राजेंद्र माने यांना दिली. त्यानंतर झोन पथकाने गणेश तांडा येथे खबर्‍यामार्फत माहिती मिळवली आणि तेथे छापा टाकला असता संतोष हरी चव्हाण सापडला. तक्रारदार विकास भुपी यांना संतोष चव्हाण याचा फोटो दाखवताच त्यांनी ताबडतोब त्याला ओळखले. संतोष चव्हाण याची चौकशी केली असता त्याने चोरी केल्याची कबुली दिली आणि चोरीतील निम्मा हिस्सा अंदाजे १२ हजार ६०० रूपयाचा ऐवज पोलिसांना दिला.

Leave a Comment