लष्करप्रमुखांना लाच देण्याचा प्रयत्न सेवानिवृत्त तेजिंदर सिंग यांनी केला – अँटोनी

नवी दिल्ली, दि.२७ – आपल्याला लाच देण्याचा प्रयत्न केला गेल्याचे लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंह यांनी सांगितल्याचे सुरक्षा मंत्री ए. के. अॅंटोनी यांनी मंगळवारी सांगितले. याप्रकरणी माझा लष्करप्रमुखांना पूर्ण पाठींबा आहे असेही ते म्हणाले.
 सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल तेजिंदर सिंग यांनी लष्करप्रमुखांना १४ कोटी रूपयांची लाच देण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती राज्यसभेत अॅटोनी यांनी दिली. लष्करासाठी दुय्यम दर्जाच्या वाहनांची खरेदी करण्यासाठी त्यांनी लाच देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, मला हे प्रकरण वाढवायचे नाही, असे लष्करप्रमुखांनी मला सांगितल्याचे अँटोनी म्हणाले.
  लष्करप्रमुखांनी लाच देणार्‍या व्यक्तीचे नाव मला सांगताच मला धक्काच बसला असे अँटोनी म्हणाले. दरम्यान, याप्रकरणी सीबीआय चौकशी करण्यात येईल. जो अपराधी असेल त्याला शिक्षा होईल. मग ती व्यक्ती कितीही ताकदवान असो, असे त्यांनी नमूद केले. आयुष्यभर भ्रष्टाचाराविरोधात लढा देत असल्यामुळे यापुढे झुकणार नाही असे सुरक्षा मंत्र्यांनी सांगितले.
  लाच देण्याप्रकरणी लष्करप्रमुखांनी कोणतीही लेखी तक्रार दिली नसल्याचे सांगून ते म्हणाले, एका सेवानिवृत्त जनरलकडून लाच देण्याचा प्रयत्न केला गेला हीच मोठी धक्कादायक बाब होती. अद्यापही लष्करप्रमुखांनी कोणतीही लेखी तक्रार दिलेली नाही . दरम्यान, या प्रकरणी सरकारला पाठींबा देवू असे भाजपने सांगितले आहे. हे प्रकरण लवकर संपुष्टात आणण्यासाठी सरकारने पावले उचलायला हवीत, असे भाजप नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते अरूण जेटली यांनी सांगितले.