
मुंबई, दि. २७ – यंदाच्या अर्थसंकल्पात उत्पादन शुल्कात करण्यात आलेल्या वाढीमुळे वाहन उत्पादक कंपन्यांनी भाववाढ करण्याचा सपाटा लावला आहे. महिन्द्र अॅण्ड महिन्द्र, टाटा मोटर्स व होंडा सिएल या कंपन्यांच्या पावलावर पाऊल ठेवत आघाडीच्या वाहन उत्पादक मारूती सुझुकीने आपल्या मोटरींच्या किमती चार हजारपासून १७ हजार रूपयांपर्यत वाढविल्या आहेत. मारूती ८०० ते सेदान प्रकारातील एसयुक्स -४ या मोटारी महागल्या आहेत.
अर्थसंकल्प २०१२-१३ मध्ये उत्पादन शुल्क १० टक्क्यांवरून १२ टक्के करण्यात आले आहे तर मोठया मोटारींवरील उत्पादन शुल्क २२ टक्क्यांनी वाढणार आहे. आधीच रूपयाच्या घसरणीमुळे कच्च्या मालाच्या आयातीवरील खर्च वाढल्याने बेजार असलेल्या वाहन उत्पादक कंपन्यांच्या उत्पादन खर्चावर उत्पादन शुल्काचा अतिरिक्त भार पडणार आहे. यामुळे मारूती सुझुकीने मोटारींच्या किमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
या आधी टाटा मोटर्सने भाववाढ केली आहे. तसेच आलिशान मोटारींची निर्मिती करणा-या व्होल्वो ऑटो इंडियाने कारच्या किमतीमध्ये १ लाख ३० हजार रूपयांपर्यंत वाढ केली आहे. सर्वच श्रेणीतील मोटारींच्या किमतींमध्ये १ लाख ते १ लाख ३० हजार रूपयांपर्यत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे व्होल्वोने म्हटले आहे. त्याचबरोबर स्कोडा ऑटोनेही आपल्या मोटारींच्या किमतीमध्ये २.२ टक्के ते ५.१ टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. मारूती सुझुकी, महिन्द्र अॅण्ड महिन्द्र व होंडा सिएल या कंपन्यांनी मोटारींच्या किमती ७० हजार रूपयांपर्यंत वाढविण्याचा निर्णय अर्थसंकल्पानंतर जाहीर केला होता. मारूतीने आपल्या मोटारींच्या किमती वाढवून वाहन खरेदीसाठी इच्छुक असणा-यांना झटका दिला आहे. मोटारींच्या किमती सरासरी १.७५ टक्क्यांनी वाढविण्यात आल्या आहेत.