नवी दिल्ली, दि. २७ – टू-जी स्पेक्ट्रमला मागे टाकेल असा जमीन घोटाळा कर्नाटकात उघड झाला आहे. गेल्या काही दिवसात सातत्याने मोठमोठे घोटाळे उघडकीस येत असल्यामुळे काँग्रेस सरकार समोरील अडचणी वाढतच चालल्या आहेत.
गेल्या दशकात वक्फ बोर्डाच्या मालकीची २२ हजारहून अधिक ठिकाणची संपत्ती बेकायदेशीररित्या बळकावून विकण्यात आल्याची माहिती कर्नाटकातील अल्पसंख्यांक आयोगाला मिळाली आहे. यामध्ये सुमारे दोन लाख कोटी रूपयांचे नुकसान राज्य सरकारला झाले आहे. या घोटाळ्यात काही प्रमुख राजकारण्यांचा सहभाग असल्याचे राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष अन्वर मणिपड्डी यांनी सांगितले. काँग्रेसमधील ३८ नेत्यांचा यामध्ये सहभाग असल्याचे सांगण्यात येत आहे.
‘इतर ठिकाणांची तपासणी केली पाहिजे असा विचार आम्ही केला आणि आमच्यासमोर धक्कादायक माहिती उघड झाली. काही जणांनी आपल्या नावे आणि नातेवाईकांच्या नावावर या जमिनी बेकायदेशीररित्या बळकाविल्या आहेत’, असे मणिपड्डी यांनी सांगितले. आम्ही आता ७ हजार ५०० पानांचा अहवाल सादर केला आहे, असेही ते म्हणाले. ‘ही सर्व संपत्ती परत मिळाली तर कोणीही मुस्लीम रूग्णालयांच्या कमतरतेमुळे किंवा औषधांअभावी मरणार नाही. तसेच मुस्लिम समाजाला कोणत्याही समस्या भेडसावणार नाहीत’, असे त्यांनी सांगितले.
या प्रकरणाचा अहवाल सोमवारी मुख्यमंत्री डी व्ही सदानंद गौडा यांच्याकडे सुपूर्द केला आहे. येत्या एक-दोन दिवसात राज्य विधानसभेत हा अहवाल मांडण्यात येईल. या अहवालानुसार, वक्फ बोर्डाच्या पदाधिकार्यांनी गेल्या ११ वर्षांत या जमिनी खाजगी व्यक्तींना आणि संस्थांना हस्तांतरीत करण्यास मदत केली. तसेच, ८५ टक्के जमिनी बंगळूरूमधील असल्याचे समोर आले आहे.