२०१५ ची विश्वचषक स्पर्धा खेळायला आवडेल – सचिन

जोपर्यंत आपण एक खेळाडू म्हणून देशासाठी सर्वोत्तम कामगिरी करू शकतो, तोपर्यंत खेळत रहायचे. मात्र ज्या दिवशी आपली खेळण्याची क्षमता कमी झाल्याचे प्रत्ययास येईल, त्यादिवशी आपण निवृत्ती जाहीर करावी, असे प्रतिपादन शतकांचा महाराजा सचिन तेंडुलकर याने केले. आपल्या निवृत्तीबद्दलच्या वावड्यांचे खंडन करताना सचिनने आपल्याला २०१५ साली ऑष्ट्रेलियामध्ये होणारी विश्वचषक स्पर्धा खेळायला आवडेल, असे सांगितले. 

बांग्लादेशमध्ये नुकत्याच झालेल्या आशिया चषक एकदिवसीय क्रिकेट मालिकेत १०० शतकांचा अभूतपूर्व विक्रम साकारणार्‍या विक्रमादित्य सचिनने रविवारी मुंबईत पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी पत्रकारांच्या गुगली आणि बाउन्सर्सना लीलया खेळून काढत सचिनने आपले व्यत्त*ीमत्व सुद्धा आपल्यातील खेळाडूइतकेच परिपक्व असल्याची जाणीव सर्वांना करून दिली.

सचिनने क्रिकेटमध्ये केलेल्या अनेक विक्रमांचे श्रेय आपल्या कुटुंबियांना व गुरूवर्य रमाकांत आचरेकर यांनी दिले. जगातील अनेक दिग्गज क्रिकेटपटूंचा आदर्श असलेल्या सचिनने आपले आदर्श मात्र आपले वडिल प्रा. रमेश तेंडुलकरच असल्याचे नमूद केले. आपण झळकाविलेल्या पहिल्या शतकानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेस जितके पत्रकार उपस्थित होते, त्यापेक्षा कित्येक पट अधिक पत्रकार आजच्या पत्रकार परिषदेस उपस्थित आहेत. आपल्याविषयी लोकांच्या वाढत्या अपेक्षांच्या जाणीवेतूनच आपल्यावर थोडासा दबाव निर्माण होतो, असे सचिन म्हणाला.

आपण विक्रमांसाठी नव्हे तर देशासाठी खेळतो आहोत. त्यामुळे विक्रमांच्या शिखरावर आरूढ झाल्यावर निवृत्ती घेण्याऐवजी आपण आपल्या राष्ट्रीय संघासाठी उत्कृष्ट कामगिरी करीत राहीपर्यंत खेळत राहणार असल्याचे, यावेळी सचिनने पुन्हा एकदा स्पष्ट केले.  ड*ेसिगरूममधील चर्चा तेथपर्यंतच मर्यादीत रहायला हवी, असे सांगत सचिनने ऑष्ट्रेलियाया दौर्‍यात कर्णधार महेंद्रसिह ढोणीने राबविलेल्या रोटेशन पॉलीसीची पाठराखण केली. त्यावेळी अनेक खेळाडू दुखापतग्रस्त असल्यामुळेच संघ व्यवस्थापनाने ही पद्धत राबविल्याचे त्याने सांगितले.

Leave a Comment