कवी ग्रेस अनंतात विलीन

पुणे,दि.२६- मानवी संवेदना वेदना आणि आत्ममग्नता याचे यथार्थ दर्शन प्रभावीपणे घडविणारे महाकवी समीक्षक आणि ललित लेखक ग्रेस अर्थात प्रा. माणिक गोडघाटे यांचे आज सकाळी १० वाजता कर्करोगाने निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर नागपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
     कवी ग्रेस हे मागील ३ वर्षापासून घशाच्या कर्करोगाशी झुंज देत होते. या कर्करोगाचा प्रादुर्भाव ६ महिन्यापूर्वी त्यांच्या यकृतापर्यंत पोहोचला. त्यासाठी ते येथील मा. दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात उपचार घेत होते. मात्र मागील १५ दिवसांपासून त्यांचे शरीर उपचारांना प्रतिसाद देईनासे झाले आणि या विकाराशी झुंजताना त्यांची प्राणज्योत मावळली.
     दि.१० मे १९३७ रोजी जन्मलेले ग्रेस नागपुरातील मॉरीस महाविद्यालयात मराठी विषयाचे अध्यापन करीत असत. सन १९६७ मध्ये संध्याकाळच्या कविता या काव्यसंग्रहाद्वारे त्यांनी साहित्यनिर्मिती क्षेत्रात पदार्पण केले. आपल्याला लाभलेले शब्दवैभवाचे लेणे हा ईश्वरी प्रसाद आहे अशा अर्थाने त्यांनी ग्रेस या टोपणनावाने साहित्यनिर्मिती केली. त्यांच्या पहिल्याच काव्यसंग्रहाला सन १९६८ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या कविवर्य कुसुमाग्रज काव्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वारयाने हलते रान या त्यांच्या ललित लेख संग्रहाला मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार सन २०११ मध्ये देण्यात आला. त्यांचे चंद्रमाधवीचा प्रदेश, चर्चबेल, मितवा, मृगजळाचे बांधकाम, सांध्यपर्वातील वैष्णवी , कावळे उडाले ,स्वामी असे ललित आणि काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांचे लेखन आत्ममग्न आणि दुर्बोध असल्याचा आक्षेप घेतला जात असला तरीही त्यांच्या साहित्याने त्यांचा स्वतःचा असा एक विशिष्ट रसिकवर्ग निर्माण केला. ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता, भय इथले संपत नाही, वारयाने हलते रान ही त्यांची गाणी लोकप्रिय ठरली. त्यांच्या लेखनाप्रमाणेच त्यांच्या व्यक्तिमत्वालादेखील एक गूढात्मकतेचे वलय प्राप्त झाले होते. संस्था सभा साहित्य संमेलने आणि काव्य संमेलने यापासून ग्रेस कायम फटकून राहीले. त्याच बरोबर त्यांच्या फटकळ स्वभावामुळे त्यांचे व्यक्तिमत्वही कोषमग्न आणि माणूसघाणे असल्याची प्रतिमा निर्माण झाली. मात्र या सगळयाचे स्पष्टीकरण देण्याच्या भानगडीत न पडता त्यांनी आपली साहित्यसेवा सुरूंच ठेवली. कर्करोगाशी झगडतानाही त्यांनी हा वसा सोडला नाही. सहसा सभा संमेलनात न रमणारे ग्रेस हे त्यांचे सुहृद ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांच्या साथीने संगीत आणि संवादाचा कार्यक्रम सादर करीत. त्यांची उत्स्फुर्तता हे या कार्यक्रमाचे वैशिष्टय होते. या कार्यक्रमाला कोणतीही लिखित किवा ठरीव संहिता नसे. त्यामुळे हा कार्यक्रम त्यांच्या उत्स्फुर्ततेने विलक्षण् रंगत असे. विकारग्रस्त असतानाही त्यांच्या या कार्यक्रमात खंड पडला नाही.
     या मनस्वी व्यक्तिमत्वाच्या निधनाने मराठी साहित्य आणि संगीत क्षेत्राचे भरून न येणारे नुकसान झाले असल्याची भावना या क्षेत्रातील मान्यवर आणि रसिकांनी ग्रेस यांना श्रद्धांजली अर्पण करताना व्यक्त केली.