
नवी दिल्ली, दि. २६- जन्मतारखेच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारशी झालेला मोठा वाद संपल्यानंतर देशाचे लष्कर प्रमुख जनरल व्ही. के. सिंह यांनी आता नवीन खुलासा केला आहे. आपल्याला १४ कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचा खळबळजनक खुलासा त्यांनी केला आहे. हे प्रकरण गंभीर असल्याचे सांगून सरकारने यावर सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत.
सिंह यांनी द हिंदू या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. दुय्यम दर्जाच्या ६०० गाड्या खरेदी करण्यासाठी एका कॉर्पोरेट सल्लागाराने त्यांना १४ कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केला, असे त्यांनी या मुलाखातीत सांगितले. याबाबत त्यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री ए. के. अँटनी यांच्याशी चर्चा केली होती, असे ते म्हणाले. लाच देणारा हा काही काळापूर्वी लष्करातून निवृत्त झाला आहे. तो सिंह यांना म्हणाला होता की, तुमच्या आधीही अनेकांना लाच दिली गेली आहे आणि तुमच्या नंतरही दिली जाईल. ही व्यक्ति ज्या कंपनीच्या गाड्या खरेदी करण्यास सांगत होती त्या कंपनीच्या सात हजार गाड्या लष्कराने मोठ्या किमतीवर खरेदी केल्या आहेत.
दरम्यान, सेना प्रमुखांना लाच देण्याच्या प्रयत्न हा एक गंभीर मुद्दा असून हे प्रकरण सरकार योग्यरित्या हाताळेल, असे संरक्षण मंत्री ऐ. के. अँटनी यांनी सांगितले. मात्र, सिंह यांना जर लाच देण्याचा प्रयत्न केला गेला असेल तर त्यांनी स्वतः त्या व्यक्तिविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार खटला दाखल करायला हवा होता, असे काँग्रेसने म्हटले आहे.
याविषयावरुन विरोधी पक्षाने संसंदेत गदारोळ केला. सेना प्रमुखांना लाच देण्याचा प्रयत्न हा गंभीर मुद्दा असून त्यावर योग्य कारवाई झाली पाहिजे, असे भारतीय जनता पक्षाचे म्हणणे आहे.