
पुणे, दि. २३ (प्रतिनिधी) – गेल्या एकवीस दिवसांपासून शहरात थैमान घालत असलेल्या स्वाइन फ्लूचे शनिवारी आणखी १३ जणांना लागण झाली. १ रुग्ण ओपीडी व १२ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती पुणे महापालिका सहायक आरोग्यप्रमुख सातपुते यांनी दिली.
गेल्या वीस दिवसांत १२५ जणांना स्वाइन फ्लूची लागण झालेली आहे. स्वाइन फ्लूने आत्तापर्यंत सहा जणांचा मृत्यु झाला आहे. ४१ रुग्ण ओपीडीवर उपचार घेत आहेत. २७ जणांना उपचार देऊन घरी सोडण्यात आले आहे. आयसोलेसन वॅार्डात ३७ रुग्ण उपचार घेत आहेत. हवामानातील झालेला बदल आणि संसर्गजन्यआजारांमुळे स्वाइन फ्लूने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेत, सर्दी, ताप, खोकला, घसा खवखवणे यासरखी लक्षणे आढळल्यास, त्यावर दोन दिवस औषधोपचार घेऊनही बरे वाटत नसेल तर त्वरीत स्वाइन फ्लू तपासणी केंद्रावर जाऊन आवश्यक ती तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागप्रमुख एस. टी. परदेशी व सहाय्यक आरोग्यप्रमुख सातपुते यांनी केले आहे.
