हिरवाईत देशात नागपूर दुसरे तर मुंबईचा क्रमांक चौथा

नागपूर, दि. २४ – देशात हिरवे सुंदर शहर म्हणून नागपूरचा दुसरा क्रमांक लागल्याचे नुकत्याच झालेल्या वृक्षगणनेत स्पष्ट झाले आहे. नागपूर महानगरपालिकेने केलेल्या या वृक्षगणनेत शहरात २१ लाखांहून अधिक वृक्ष आढळून आले आहेत. नागपूर महापालिकेतर्फे मागील दोन वर्षात सूत्रबद्ध पद्धतीने वृक्षगणनेची प्रक्रिया पार पाडण्यात आली. सॅटेलाइट निरिक्षणाच्या आधारावर करण्यात आलेल्या या वृक्षगणनेत, संपूर्ण नागपूर शहरात २१ लाख ४३ हजार ८३८ वृक्ष आढळून आले. हे प्रमाण प्रत्येक १० व्यक्तिगणिक ९ वृक्ष असे आहे.
राज्यातील पहिल्या क्रमांकाचे तर राष्ट्रीय पातळीवर बेंगळूरूनंतरचे दुसर्‍या क्रमाकांचे हिरवे शहर म्हणून आपली ओळख नागपूरने गेली अनेक वर्षे कायम ठेवली आहे. यंदाच्या वृक्षगणनेतही राज्यातील आपले पहिले स्थान या शहराने राखले आहे. २० लाख ५५ हजाराइतकी वृक्षसंपदा असलेल्या नाशिकने या मोजणीमध्ये दुसरा क्रमांक मिळविला आहे. तिसर्‍या क्रमाकांवर बृहन्मुंबई असून तेथे १९.१७ लाख झाडे आहेत.