शिष्यवृत्ती गैरव्यवहार प्रकरणी चौकशीचे आदेश

अमरावती, दि. २४ – पुणे येथील उच्च शिक्षण सहसंचालकांच्या कार्यालयातून आलेली शिष्यवृत्तीची रक्कम आणि प्रत्यक्ष विद्यार्थ्याना स्थानिक कार्यालयातून देण्यात आलेली शिष्यवृत्तीची रक्कम यात बरीच तफावत आढळून आल्याने येथील अॅड. सुरेश आचार्य यांनी राज्य माहिती आयोगाच्या अमरावती खंडपीठाकडे तक्रार दाखल केली आहे. राज्य माहिती आयोगाच्या अमरावती खंडपीठाने सकृतदर्शनी तक्रारीत सत्यता आढळल्याने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
येथील अॅड. सुरेश आचार्य यांनी माहितीच्या अधिकारात अहमदनगर येथील मासुमिया शिक्षणशास्त्र महाविद्यालयासंदर्भात अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्‍या शिष्यवृत्ती रक्कमेबाबतची, पुणे येथील उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयासोबत झालेल्या पत्रव्यवहाराची, विद्यार्थ्यांनी काढलेल्या बँक खाते तसेच विद्यार्थ्यांना मंजूर झालेल्या शिष्यवृत्तीची माहिती मागितली होती. उच्च शिक्षण सहसंचालकांच्या माध्यमातून दिली जाणारी शिष्यवृत्ती आणि विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष जमा झालेली शिष्यवृत्तीची रक्कम, यातील तफावत तपासणे हा यामागील खरा हेतू होता.
कागदपत्र सुद्धा उपलब्ध झाले. त्याची तपासणी केली असता सहसंचालकांनी पाठविलेल्या आणि विद्यार्थ्यांना मिळालेल्या शिष्यवृत्ती रकमेत बरीच तफावत आढळून आली. त्यामुळे आचार्य यांनी संबंधित विभागाकडे प्रथम अपील सादर केले होते. त्यात अपिलीय अधिकार्‍यांनी माहिती अधिकार्‍यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. एका विद्यार्थिनीला ३६ हजार रुपये मंजूर झाले असताना तिच्या खात्यात केवळ ४ हजार ८५० रुपये जमा झाल्याची गंभीर बाब उघडकीस आली. त्यामुळे विद्यमान आयोगाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पुण्याच्या उच्च शिक्षण सहसंचालकांना दिले आहेत. या आदेशान्वये दोषींवर कडक कारवाई केली जाईल अशी आशा आचार्य यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Comment