भ्रष्टाचाराच्या जोखडातून निवडणूक प्रक्रिया मुक्त करण्याची गरज – कन्नन

नागपूर,दि. २४ – भ्रष्टाचाराच्या जोखडातून निवडणूक प्रक्रिया मुक्त करण्यासाठी तसेच लोकशाही व्यवस्थेतील काळ्या पैशाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी स्वयंसेवकांनी प्रयत्न करावे, असे आवाहन रा. स्व. संघाचे सहसरकार्यवाह के. सी. कन्नन यांनी केले. रा. स्व. संघ नागपूर महानगरच्या वर्षप्रतिपदा उत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून कन्नन बोलत होते. यावेळी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, विदर्भ प्रांत सहसंघचालक राम हरकरे, नागपूर महानगर संघचालक डॉ. दिलीप गुप्ता आणि सहसंघचालक लक्ष्मणराव पार्डीकर उपस्थित होते.
समाजात फोफावलेला भ्रष्टाचार, सत्तेसाठी सुरु असलेली जीवघेणी स्पर्धा आणि पाश्चात्य संस्कृतीचा वाढता प्रभाव हेच या सर्व समस्यांचे मूळ असल्याचा आरोप कन्नन यांनी केला. व्यवस्थेतील हे दोष दूर होत नाहीत तोपर्यंत सशक्त आणि विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होऊ शकणार नाही, याकडे लक्ष वेधत कन्नन म्हणाले की, पाश्चात्यांचा भोगवादी संस्कृतीचा मार्ग आमच्या देशाला परवडणारा नाही. सर्व दोष आणि त्रुटींवर मात करत भारत २०२० नंतर महाशक्ती झालेला असेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
निवडणूक प्रक्रियेतील दोषांवर जोरदार हल्ला चढवताना कन्नन म्हणाले की, आधी निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवार कोट्यवधी रुपये खर्च करतो आणि नंतर हा खर्च झालेला पैसा वसूल करण्याच्या मागे लागतो. यामुळेच समाजाच्या सर्व स्तरातील भ्रष्टाचार वाढतो आणि सार्वजनिक सेवांचा दर्जा घसरतो. अमेरिकेने अतिरेक्यांविरुद्ध जशी कठोर कारवाई केली, तशी कारवाई आम्ही क्षुद्र राजकीय स्वार्थासाठी तसेच गठ्ठा मतांच्या राजकारणासाठी करत नाही, असा आरोप कन्नन यांनी केला.

Leave a Comment