सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी…

* श्रीविठ्ठल मुर्तीवर सिलीकॉन वॅकर लेप प्रक्रिया पूर्ण
* लेप १० वर्ष टिकणार
* यापुढील काळात मूर्तीस केशर पाणी, दुधाने महापूजा
* लेप प्रक्रियेसाठी श्रीविठ्ठल भक्ताने केला खर्च
* श्रीविठ्ठल चरणावर लवकर चांदीचे कवच

पंढरपूर, दि.२२ – सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी, करकटा वरी ठेवू निया…
लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेली श्रीविठ्ठल मूर्ती संवर्धनासाठी औरंगाबाद येथील केंद्रीय पुरातन विभागाचे अधीक्षक एम.सिंग व प्रतिमाकार आर. एस. त्रिबके यांनी श्रीविठ्ठल मूर्तीस सिलीकॉन वॅकर लेप दिल्यामुळे मूर्तीस उजाळा मिळाला असून आजपासून (गुरूवार)  श्रीविठ्ठलाचे पददर्शन सुरू करण्यात येणार आहे. श्रीविठ्ठल चरणाची झीज रोखण्यासाठी चरणावर चांदीचे कवच बसविण्याचा विचार मंदिर समिती करीत असल्याची माहिती श्रीविठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
  जगद्गुरू श्रीसंत तुकाराम भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बेलदार बोलत होते. यावेळी मंदिर समितीचे सदस्य बाळासाहेब बडवे, वा. ना. उत्पात, जयंत भंडारे, व्यवस्थापक ज्ञानेश्वर सुपेकर उपस्थित होते. १८ ते २० या कालावधीत श्रीविठ्ठल मूर्ती संवर्धनासाठी पुरातन विभागाच्या अधिकार्‍यांनी काम केले.त्यामुळे श्रीविठ्ठल मुर्ती उजळली आहे, असे सांगून बेलदार म्हणाले, पुढील काळात मूर्ती संवर्धनासाठी कोणकोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबत अहवाल केंद्रीय पुरातन विभागाचे अधीक्षक एम. सिग व प्रतिमाकार आर. एस. त्रिबके पाठविणार आहेत. पुढील काळात महापूजेसाठी केशर, पाणी व दूध वापरण्यात येणार आहे असे सांगून बेलदार म्हणाले, पंढरीत आलेले लाखो भाविक श्रीविठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होवून श्रीविठ्ठलाच्या चरणास स्पर्श करतात. त्यामुळे श्रीविठ्ठलाच्या चरणाची झीज होत असून झीज रोखण्यासाठी मूर्तीच्या चरणावर चांदीचे कवच बसविण्यात येणार आहे. कवच बसविण्या संदर्भात वारकरी संप्रदाय, बडवे, सेवाधारी यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे.
  श्रीविठ्ठल गाभार्‍यातील ग्रेनाईट चैत्री यात्रेनंतर काढण्यात येणार आहे. वातावरण नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्रीय पुरातन विभाग यंत्र पाठवून देणार असल्याची माहिती त्यांनी दिली.