चेन्नई, दि. २२- बेकायदेशीर संपत्ती बाळगल्याप्रकरणी द्रविड मुन्नत्रे कळघम पक्षाचे माजी मंत्री ए. व्ही. वेळू यांच्या निवासस्थानावर दक्षता संचालनालयाच्या भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने गुरुवारी छापे घातले. त्यांच्यावर २६ लाख रुपयांची बेकायदेशी संपत्ती बाळगल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. द्रमुकच्या सरकारमध्ये वेळू खाद्यमंत्री होते.
भ्रष्टाचार विरोधी पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी वेळू यांच्या निवासस्थानी छापे घातले. त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ अंतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आले असल्याचे त्यांनी आपल्या अहवालात जाहीर केले आहे.
दरम्यान, भ्रष्टाचार विरोधी पथकाद्वारे घालण्यात येणारे छापे ही राजकीय खेळी असून त्याला आम्ही कायद्यानुसार लढा देऊ, असे द्रमुकने यावेळी सांगितले आहे.
यापूर्वी द्रमुकच्या १२ माजी मंत्री व आमदारांच्या निवासस्थानी भ्रष्टाचार विरोधी पथकाद्वारे छापे घालण्यात आले आहेत तर त्यातील काही जण बेकायदेशीर मालमत्ता बाळगल्याप्रकरणी व अवैधरित्या जमीनसंपादन प्रकरणी पोलिस कारवाईला सामोरे जात आहेत. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या एआयएडीएमकेचे सरकार आल्यानंतर हे छापे टाकण्यात येत आहेत.