चंद्रपूर दि. २२- जागतिक वनदिनाच्या पूर्वसंध्येला चंद्रपूर वनविभागातील केळझर वनपरिक्षेत्रातील चिचोली-दहेगाव जंगलात अचानक आग लागली. या आगीत जवळपास ९०० हेक्टर जंगल भस्मसात झाल्याचे वृत्त आहे. आग अजूनही धगधगत असताना चंद्रपूर वनविभागाच्या अधिकार्यांनी केवळ पाच लोकांच्या भरवशावर आग विझविण्याचे काम सुरु केले आहे.
ही आग मंगळवारच्या पहाटेपासूनच लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. वनविभागाला आगीची माहिती देण्यात आली, मात्र वनाधिकार्यांनी केवळ पाच वनकर्मचारी आग विझविण्यासाठी पाठविले. त्यांच्यासोबत केवळ एक वनरक्षक कार्यरत होता. दिवसभर आग विझविण्याचे काम चालले. उन्हाळ्याच्या दिवसात ही आग आटोक्यात आणण्यास त्या कर्मचार्यांना अपयश आले. आगीने उग्ररुप धारण करीत कंपार्टमेंट क्र. ५१७ आपल्या ताब्यात घेतले. या आगीमध्ये कांतापेठ, चिरोली, कावलपेठ, दहेगाव, हलदी, किटाळा आणि मणकापूर गाव परिसरातील जंगलही प्रभावित झाले आहे..