नागपूर, दि. २२- सुरुवातीपासून ज्यांनी स्थानिक गोविज्ञान अनुसंधान केंद्राला मदत करुन प्रगतिपथावर नेण्यासाठी प्रयत्न केले, अशा सर्वच मान्यवरांचा विश्व हिंदू परिषदेचे माजी कार्याध्यक्ष अशोक सिंघल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी गुजराती मंडळ नागपूरकडून पाच लाखांचा धनादेश देण्यात आला. यावेळी व्यासपीठावर हुकूमचंद चावला, डॉ. चंद्रशेखर कुंडले, चंद्रकांतभाई ठक्कर, सुरेंद्रकुमार अग्रवाल उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली व अशोक सिंघल यांच्या हस्ते गोपूजन करण्यात आले. यावेळी प्रकल्पाचे सुनील मानसिंहका यांनी प्रास्तविकातून प्रकल्पाने आजपर्यंत देशहित, समाजहितासाठी केलेल्या कार्याची माहिती दिली.
यावेळी बोलताना अशोक सिंघल म्हणाले की, गाईचे रक्षण होणे ही काळाची गरज आहे. देशाचा कृषी विकास गोवंशावर आधारित आहे. कृषिप्रधान देशात गाईचे महत्त्व अधिक आहे. गाईच्या पंचगव्यापासून अनेक दुर्धर व्याधींचा नाश करणारी दिव्य औषधी निर्माण होते. त्यांनी अनेक दाखले देत स्वतःपेक्षा समाज व देशहित अधिक महत्त्वाचे आहे, हे पटवून दिले.