
पंढरपूर, दि.२१ – श्रीविठ्ठल मूर्तीच्या संवर्धनासाठी केंद्रीय पुरातन विभागाच्या अधिकार्यांनी सोमवारी रात्रौ ११ ते पहाटे ३ पर्यंत मूर्तीस ईपॉक्सी लेप प्रक्रिया पूर्ण केली असून मंगळवारी रात्रौ सिलिकॉन वॅकर २९० रासायनिक लेप प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे सावळा विठ्ठल सुकुमार दिसणार आहे. गुरूवारपासून पददर्शन सुरू करण्याचा विचार मंदिर समिती करत आहे.
लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्रीविठ्ठल मूर्तीची झीज होत असल्यामुळे श्रीविठ्ठल मूर्ती संवर्धनासाठी मंदिर समितीचे गेल्या २ वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. मंदिर समितीने महापूजा बंद केल्या आहेत. श्रीविठ्ठल मूर्ती संवर्धनासाठी गेल्या २ दिवसांपासून केंद्रीय पुरातन विभागाचे अधिक्षक एम.सिंग व प्रतिमाकार आर. एस. त्रिबके हे श्रीविठ्ठल मूर्तीवर लेप प्रक्रिया करत आहेत. पहिल्या दिवशी रविवारी श्रीविठ्ठल मूर्तीची स्वच्छता करण्यात आली. सोमवारी रात्रौ मूर्तीवर काही ठिकाणी ईपॉक्सी लेप करण्यात आला. मंगळवारी रात्रौ सिलिकॉन व वॅकर २९० ही रासायनिक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यामुळे श्रीविठ्ठल मूर्ती उजळणार असून सावळा विठ्ठल सुकुमार दिसणार आहे.
गेल्या २ दिवसांपासून श्रीविठ्ठलाचे पददर्शन बंद असल्यामुळे अनेक भाविकांनी मुखदर्शन घेतले. श्रीविठ्ठलाचे पददर्शन मिळत नसल्याची खंत अनेक भाविकांनी व्यक्त केली. जगाच्या पाठीवर इथेच श्रीविठ्ठलाचे पददर्शन घेण्याचे भाग्य भाविकांना मिळते. त्यामुळे भाविक श्रीविठ्ठलाच्या चरणावर नतमस्तक होण्यास आतुर असतो.
