पुण्याप्रमाणे मेक्सिकोमध्येही वाढतो आहे स्वाईन फ्लू

पुणे दि.२१-पुण्यात स्वाईन फ्ल्यूची लागण झालेल्यांची संख्या वाढत चालली असतानाच मेक्सिको आणि यूएसमध्येही स्वाईन फ्ल्यूचे रूग्ण आढळत असल्याचे येथील राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेचे संचालक ए.सी.मिश्रा यांनी सांगितले. मार्च महिन्यात या विषाणूचा प्रसार होण्याचे आजपर्यंतचे प्रमाण १ ते २ टक्के इतकेच असताना यावर्षी मात्र हे प्रमाण १० ते १५ टक्क्यांवर पोहोचले असल्याचेही त्यांनी सांगितले. ही परिस्थिती थोडी विचित्रच असल्याचेही ते म्हणाले.
  स्वाईन फ्ल्यूची लागण झालेला पहिला रूग्ण मेक्सिकोमध्ये आढळला होता. त्यानंतर तीन वर्षात मेक्सिको येथे असा रूग्ण आढळला नव्हता. मात्र यंदा पुण्याबरोबरच असे रूग्ण मेक्सिको तसेच यूएसमध्येही आढळले असल्याचे मिश्रा यांनी सागितले. मिश्रा म्हणाले की संस्थेकडे सध्या तीन ठिकाणांहून तपासणीसाठी नमुने येत आहेत. मॉनिटरींग साईट असलेल्या वढू गावातून तसेच जनता वसाहत पर्वती आणि हॉस्पिटल व रूग्णालयातून येणारे नमुने असे त्यांचे वर्गीकरण करण्यात येत असून संस्थेतील शास्त्रज्ञ सातत्याने त्यांचे अनालेसीस करत आहेत. तपासणीसाठी येणार्‍या नमुन्यापैकी १० ते १५ टक्के नमुने पॉझिटिव्ह आहेत म्हणजेच या विषाणूचा प्रसार १० ते १५ टक्के वाढला आहे. सर्वसाधारणपणे मार्चमध्ये हे प्रमाण १ ते २ टक्के इतकेच असते.
   एचवन एनवन विषाणूत बदल नक्कीच झाला आहे पण तो फार गंभीर स्वरूपाचा नाही असे सांगून मिश्रा म्हणाले की हा बदल अपेक्षित असतोच. सध्या तरी हा विषाणू टॅमिफ्ल्यूने बरा होणारा आहे. या विषाणूचा प्रसार इतक्या वेगाने होण्यामागे ठोस कारणे देता येत नसली तरी लांबलेली थंडी आणि तपमानात सातत्याने होत असलेले बदल ही अनेक कारणांमधील दोन कारणे आहेत. अर्थात तपमानात वाढ होत जाईल तसे लागण होण्याचे प्रमाण कमी होत जाईल. आता उन्हाळा चांगलाच जाणवू लागला असल्याने लागण होण्याचे प्रमाण कमी होईल पण पावसाळ्यात पुन्हा या विषाणूचा उद्रेक होईल किवा कसे हे मात्र आत्ताच सांगता येणार नाही असेही ते म्हणाले.
पुण्यात स्वाईन फ्ल्यूमुळे मरण पावलेल्यांची संख्या सहावर गेली असली तरी या सर्वांना दुसरेही कांही आजार होते असेही मिश्रा यांनी स्पष्ट केले.
नव्याने लागण झालेल्यांची संख्या २१ वर गेली असून एकूण रुग्णांची संख्या ९६ झाली असल्याचे समजते.