न्यूयॉर्क, दि. २१- संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयाबाहेर गेल्या महिनाभरापासून उपोषणास बसलेल्या तिबेटीयन्सनी आपले उपोषण सोडण्यास नकार दिला आहे. संपूर्ण जगाने तिबेटमधील स्थितीचा आढावा घेण्यासाठी हस्तक्षेप करावा आणि तिबेटीयन जनतेची पिळवणूक थांबवण्यासाठी चीनवर दबाव आणण्यात यावा, अशा मागण्या त्यांनी केल्या आहेत.
शिग्जा रिंपोच (३२), डॉर्जी गॅलपो (५९) आणि येशी तेझींग (३९) हे तीन तिबेटीयन २२ फेब्रुवारीपासून संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयासमोर उपोषणास बसले आहेत. चीन तिबेटीयन जनतेची कशा प्रकारे पिळवणूक करीत आहे याकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही उपोषण करत आहोत, असे तिबेटीयन युवा काँग्रेस अध्यक्ष त्सेवांग रिगझिन यांनी सांगितले.
या उपोषणाद्वारे आम्ही संयुक्त राष्ट्राना विनवणी करत आहोत की, त्यांनी तिबेटमधील कठीण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सत्य शोधक प्रतिनिधी मंडळ पाठवावे, तसेच, संपूर्ण जगाने देखील तिबेटमधील अघोषित मार्शल लॉ थांबवण्यासाठी चीनवर दबाव आणावा. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांना इथे येवून तपास करण्याची परवानगी द्यावी, असे ते म्हणाले.
महिनाभर उपोषण केल्यामुळे गॅलपोची तब्येत ढासळली. त्यामुळे न्यूयॉर्क पोलिस विभागाने त्याला रूग्णालयात दाखल केले. दरम्यान, ‘गॅलपोने रूग्णालयातही काहीच खाणार नसल्याचा पण केला आहे. संयुक्त राष्ट्रानी मागण्या पूर्ण केल्याशिवाय तिबेटीयन जनता मागे हटणार नाही. यासाठी तिबेटीयन नागरीक आपले प्राण द्यायलाही तयार आहेत’, असे रिगझीन यांनी सांगितले.