नवी दिल्ली, दि. २१ – नवनियुक्त रेल्वेमंत्री मुकुल रॉय यांनी बुधवारी पहिल्यांदा रेल्वे भवनला भेट दिली आणि वरिष्ठ अधिकार्यांबरोबर चर्चा केली.
तृणमूल नेते मुकुल रॉय यांनी मंगळवारी रेल्वेमंत्रिपदाची शपथ घेतली. माजी रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांनी केलेली भाडेवाढ काही अंशी कमी करण्याचा प्रयत्न रॉय करणार आहेत. यामध्ये द्वितीय आणि स्लीपर श्रेणीच्या भाडेवाढीत कपात होण्याची शक्यता आहे. रेल्वेभाडेवाढ केल्यामुळे त्रिवेदी यांना ममता बॅनर्जींचा रोष ओढवून घ्यावा लागला.
रेल्वे सुविधांच्या आधुनिकीकरणासाठी रेल्वेला गुंतवणुकीची नितांत गरज आहे, असे रेल्वे मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले. तसेच, रेल्वे अपघात रोखण्यासाठी रेल्वे सुरक्षा चेतावणी प्रणाली स्थापित करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.