नवी दिल्ली, दि. २१- माओवाद्यांद्वारे इटालियन नागरिकांच्या अपहरणाप्रकरणी केंद्र सरकार राज्य सरकारची मदत करत नसल्याचा ओडीसाचे मुख्यमंत्री नविन पटनायक यांचा दावा देशाचे गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी बुधवारी फेटाळून लावला आहे. एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही तथ्याशिवाय अशा प्रकारचे वक्तव्य करणे चुकीचे आहे, असे चिदंबरम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
ओडीसा राज्याने संबंधीत विषयावर केंद्र सरकारकडे कोणत्याही प्रकारची मदत अद्याप मागितलेली नाही, असे ते म्हणाले. जर त्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य केले असेल तर मी खूप निराश आहे. रविवारी माझे त्यांच्याशी बोलणे झाले. मी त्यांना कोणत्याही प्रकारची मदत पुरविण्यास तयार असल्याचे सांगितले. मात्र त्यांनी माझ्याकडे मदत मागितली नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी येथे दिले.
केंद्रीय गृह सचिवाने त्यांना मंगळवारी व बुधवारी फोन केला. तसेच ओडीसाच्या गृह सचिवाला व पोलिस महासंचालकाला फोन करुन मदत पुरविण्यासंबंधी चर्चा केली. मात्र मी काही मिनीटांपूर्वी कार्यालयातून बाहेर पडण्याआधी पर्यंत त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची मदत मागण्यात आली नाही, असे चिदंबरम म्हणाले. पाऊलो बॉस्सूको (५४) आणि क्लाऊडीओ कोलांजेला (६१) या इटालियन नागरिकांचे येथील माओवाद्यांनी अपहरण केले आहे.