महाशतकवीर

गेल्या पिढीतले अनेक लोक आपले आयुष्य कसे छान होते हे सांगत असतात. काही लोक सांगतात  की त्यांनी महात्मा गांधींना पाहिले आहे. काही लोक सांगतात की, संगीताच्या क्षेत्रातला चमत्कार मानले गेलेल्या बालगंधर्वांना आम्ही प्रत्यक्ष पाहिले आहे. काही लोक सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे भाषण ऐकले असल्याचे असेच कॉलर ताठ करून सांगत असतात. कधी कधी मनात विचार येतो की आपण आपल्या नातवंडांना असे काही सांगू शकू की नाही. तसे आपण अगदीच दुर्दैवी नाही. आपण आता जीवनाच्या विविध क्षेत्रातली एव्हरेस्ट शिखरे याचि देही याचि डोळा अनुभवत आहोत. त्यात अमिताभ बच्चन आहे. लता मंगेशकर आहे आणि हो ! सचिन तेंडुलकरही आहे. यांनी आपल्या जीवनात केलेली कामे शतकाच्याच नव्हे तर सहस्रकाच्या इतिहासातही ठळकपणाने नोंदवून ठेवावीत अशी आहेत. आपणही काही अगदीच कमनशिबी नाही. या अनेक शतकांना पुरून उरणार्‍या महानायकांचे जीवन याच काळात आपल्या साक्षीने घडत आहे. त्यातला सचिन तेंडुलकर हा तर एक चमत्कारच आहे. तो शंभर शतके ठोकणारा जगातला एकमेव क्रिकेट पटू ठरला आहे. तो आता कीर्तीच्या शिखरावर आहे ही गोष्ट खरी पण अशा वेळी त्याचे अभिनंदन करताना त्याच्या यशाचे नेमके गमक काय आहे याचा शोध घेतला पाहिजे आणि आजच्या तरुणांपुढे त्याचे निष्कर्ष मांडले पाहिजेत. स्वामी विवेकानंदांनी आपल्या देशातल्या तरुणांना परोपरीने  उपदेश केला आहे आणि कोणाच्याही यशाचे गमक एकाग्रता हे असते असे म्हटले आहे. आपण आसपास लक्ष न देता एकच तास पण शांततेने अभ्यास करतो तेव्हा विक्रमी कमी वेळेत विक्रमी जास्त अभ्यास होत असतो. तो चांगलाही होतो. माणसाच्या मनाची ताकद अमर्याद असते पण त्या मनाची एकाग्रता किती साधली जाते यावर त्या ताकदीचा आविष्कार किती प्रभावीपणाने होणार हे अवलंबून असते. सचिन तेंडुलकरही त्याला अपवाद नाही. तो फलंदाजी करतो तेव्हा त्याची बॉलवरची घारीसारखी नजर फार पक्की असते. अर्जुन हा मोठा धनुर्धर होता. त्याला शिक्षण देताना द्रोणाचार्य त्याचे आपल्या लक्ष्यावर पूर्ण लक्ष आहे की नाही असे विचारीत असत. तेव्हा अर्जुन आपल्या गुरूंना म्हणत असे. आता मला केवळ तो पक्षी आणि त्याचा डोळाच दिसत आहे. अन्य काहीही दिसत नाही. अर्जुनाला आपल्या शिकारीशिवाय काहीच दिसत नसे तसा सचिनला केवळ बॉलच दिसतो. जगाभरातले गोलंदाज गोलंदाजी करताना ती हिकमतीने करून फलंदाजाला चकवून बाद करीत असतात पण सचिन तेंडुलकर हा जगातला असा एकमेव फलंदाज आहे की जो गोलंदाजाला चकवत असतो. त्याचे ते वैशिष्ट्य आहे. एका मध्यमवर्गीय घरात जन्मलेल्या सचिनला खेळाची आवड आहे हे त्याच्या घरातल्या लोकांना कळले होते पण त्याची खेळाडू म्हणून असलेली सुरूवात टेनिसमध्ये झाली होती. तो क्रिकेट खेळण्यासाठी जन्माला आला आहे याची जाणीव ज्येष्ठांना आणि त्याचे गुरू आचरेकर यांना झाली नसती तर इतिहास वेगळाच घडला असता. पण योग्य वेळी त्याच्या हातात क्रिकेटची बॅट आली आणि आपल्याला या क्षेत्रातले एक अत्युच्च शिखर अनुभवायला मिळाले. खरे तर क्रिकेट हा खेळ भारतात  फार लोकप्रिय आहे. असे असले तरी बरेच लोक क्रिकेटच्या बाबतीत अनभिज्ञ आहेत. त्यांना क्रिकेट हा खेळ काय असतो हे माहीत नाही. त्यांना त्यात रुचीही नाही. असे क्रिकेटबाबत पूर्ण अनभिज्ञ असलेले लाखो लोकही दोन वेळा क्रिकेटचे सामान आवर्जुन पहात असतात. पहिली वेळ म्हणजे भारत-पाक सामना आणि  दुसरी वेळ म्हणजे सचिन तेंडुलकरचा खेळ सुरू असतानाची वेळ. सचिनने अनेकना क्रिकेट खेळ बघायला भाग पाडले आहे. त्याची ९९ शतके झाल्यापासून त्याचे चाहते त्याच्या १०० व्या शतकाची वाट पहात होते. पण ९९ आणि १०० या दोन शतकांत   पडलेले अंतर मोठे आहे. या काळात जगभरातले लोक अस्वस्थ झाले होते. ती अस्वस्थता संपवणारे हे १००  व शतक झाले तेव्हा लोकांचा आनंद गगनात मावेनासा झाला. लोक तेंडुलकरवर केवळ क्रिकेटपटू म्हणून प्रेम करीत नाहीत.तो एक संतुलित मनोवृत्तीचा, संयमित बोलणारा आणि मोठेपणा न मिरवणारा माणूस आहे म्हणूनही लोकांना तो आवडतो. त्याने हजार वेळा पत्रकारांना सामोरा गेला असेल पण पत्रकारांशी बोलताना  फार जपून बोलावे लागते.तोंडून अपशब्द जाता कामा नये. सचिनने हे पथ्य फार कसोशीने पाळले असल्याने त्याच्या विधानाने वाद निर्माण झालाय असे कधी घडले नाही. अर्थात हाही एक विक्रम आहे आणि तो करताना संयम ठेवावा लागतो. सचिनने हा संयम काही ओढून ताणून आणलेला नाही. तो त्याच्या स्वभावाचा भाग आहे. त्याला आता तरी भारत रत्न किताब द्यावा अशी मागणी आता जोर धरायला लागली आहे. सचिनचा या किताबावर हक्क आहे असे अण्णा हजारे यांनीही म्हटले आहे. ते खरेही आहे. त्याचे वय आता ३८ वर्षे आहे. त्याला आताच हा सर्वोच्य किताब द्यावा का असा प्रश्न काही लोकांना पडला आहे पण हा किताब मिळाला तरी तो आपल्या वागणुकीत काही बदल करणार नाही असा विश्वास जनतेला वाटतो ही गोष्ट मोठीच स्पृहणीय आहे.

Leave a Comment