शस्त्रास्त्र खरेदीत चीनला मागे टाकून भारत प्रथम क्रमांकावर

लंडन, दि. १९- शस्त्रास्त्रे आयात करण्यात भारताने प्रथम क्रमांक पटकविला असून चीनला मागे टाकले आहे. भारताने यावर्षी जगातील एकूण आयातीपैकी दहा टक्के शस्त्रास्त्रांची आयात केली. गेल्या पाच वर्षांपासून भारताची आयात वाढत असून साल २००७ ते ११ दरम्यान भारताची मुख्य शस्त्रास्त्रांची आयात ३८ टक्क्यांनी वाढली आहे, असे स्वीडनच्या  थिक टँकने सांगितले आहे.
  शस्त्रास्त्रे आयात करण्याच्या शर्यतीत चीन व पाकिस्तान भारताच्या मागोमाग असून ते जगातील एकूण आयातीपैकी प्रत्येकी पाच टक्के शस्त्रास्त्रांची आयात करतात, असे स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (सिप्री) यांनी आपल्या अहवालात सांगितले आहे. काही काळापूर्वीच पाकिस्तानने चीनकडून ५० जेएफ-१७एस व अमेरिकेकडून ३० एफ-१६ विमानांची आयात केली असल्याचे सिप्रिने सांगितले.
  साल २००६-०७ मध्ये जगातील सर्वात जास्त शस्त्रास्त्रांची आयात करणारा चीन हा सध्या चौथ्या क्रमांकावर घसरला आहे. चीनने आपली शस्त्रास्त्रे तयार करण्याची क्षमता वाढविली असल्याने असे झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. शस्त्रास्त्रांच्या निर्यातीमध्ये अमेरिका, रशिया, जर्मनी, फ्रान्स आणि ब्रिटन नंतर चीन सहाव्या क्रमांकावर आहे. मात्र, शस्त्रास्त्राच्या आंतरराष्ट्रीय बाजारात चीनला अद्याप महत्वाचे स्थान लाभलेले नाही, असे सिप्रिने आपल्या अहवालात सांगितले आहे.
  भारत फ्रान्सच्या डेसॉल्ट कंपनीकडून १२६ विमानांची खरेदी करणार आहे. तसेच भारत रशियाकडून १२० सुखॉई-३०एमकेआय व १६ मिग-२९के आणि ब्रिटनकडून २० जॅगवॉर लढाऊ विमाने विकत घेणार आहे. पुढील १५ वर्षात भारत शस्त्रास्त्रांच्या खरेदीसाठी १०० बिलियन युएस डॉलर्स खर्च करणार असल्याचा अंदाजही त्यांनी या अहवालात व्यक्त केला आहे.    

Leave a Comment