नवी दिल्ली, दि. १९ – केंद्रीय रेल्वेमंत्री पदाचा राजीनामा दिलेल्या दिनेश त्रिवेदींचा राजीनामा राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्याकडे मान्यतेसाठी पाठविण्यात येईल, असे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी सोमवारी सांगितले. त्रिवदींचा ई मेल आणि राजीनामा मला रविवारी रात्री मिळाला होता. लवकरच नवी व्यक्ती रेल्वे मंत्री पदाची शपथ घेईल, असेही त्यांनी येथे सांगितले.
दरम्यान, दिनेश त्रिवेदी यांनी रविवारी रात्री आपल्या पदाचा राजीनामा पंतप्रधानांकडे पाठिविला असून त्यांच्या राजीनाम्यावर पंतप्रधान अद्याप विचार करत आहेत असे केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी सोमवारी लोकसभेत सांगितले. त्रिवेदींच्या राजीनाम्यावर राष्ट्रपती पंतप्रधानांच्या सल्ल्यावरुन निर्णय घेतील. यासंबंधी शेवटचा निर्णय आल्यास सभागृहाला कळविले जाईल, असे ते म्हणाले.
त्रिवेदींचा राजीनामा मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवणार – पंतप्रधान
पंतप्रधान आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्यात बोलणे झाले होते. व त्रिवेदींनी अद्याप आपल्या पदाचा राजीनामा दिलेला नाही, असे मुखर्जी यांनी शुक्रवारी लोकसभेत सांगितले होते. त्यावर सरकारने सभागृहाला अंधारात ठेवल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला होता.