वॉशिग्टन, दि. १७ – सोळा निरपराध अफगाणी नागरीकांची हत्या करणार्या अमेरिकी सैनिकाची ओळख पटली असूनही याप्रकरणी तपासात अमेरिका पूर्णत: सहकार्य करत नसल्याचे सांगत अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
निरपराध नागरिकांची हत्या करणारा अमेरिकन सैनिक सार्जट रॉबर्ट बेल्स असल्याचे उघड झाले आहे. बेल्सला कॅन्सास येथील फोर्ट लीवेनवोर्थ सैन्यतळावर कडक सुरक्षाव्यवस्थेत नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. परंतु, अद्यापही त्याच्यावर हत्याकांडाचा आरोप ठेवण्यात आला नाही. दरम्यान, सोळा नागरीकांची हत्या करण्यामागे केवळ एकच अमेरिकी सैनिक जबाबदार आहे का? असा प्रश्न करझाई यांनी उपस्थित केला आहे.
गेल्या रविवारी अमेरिकन सैनिकाने अफगाणी नागरीकांची केलेली हत्या आणि नाटोच्या तळावर कुराणच्या प्रती जाळून केलेली अवहेलना अशा अमेरिकाद्वारे होणार्या चुकांची मालिका सुरूच असल्यामुळे आधीच तणावपूर्ण असलेले दोन्ही देशांचे संबंध अजून तणावपूर्ण होत चालले आहेत.
या प्रकरणात अमेरिका अपेक्षित सहकार्य करत नाही आहे, अशी माहिती अफगाणिस्तानच्या लष्करप्रमुखांनी दिल्याचे करझाई यांनी सांगितले. ‘त्यामुळेच आमच्यापुढे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत आणि आम्ही ते स्पष्टपणे सांगत आहोत असे करझाई म्हणाले.
‘मला कोणतीही नुकसान भरपाई नको, मला मक्काला जाण्याची संधीही नको, मला घरही नको, मला काहीच नको. या प्रकरणात सहभागी असलेल्या अमेरिकन सैनिकांना कठोर शिक्षा व्हावी हीच माझी मागणी आहे’ असे एका गावकर्याने सांगितले. त्याचा भाऊ या घटनेत ठार झाला.