मुंबई, दि. १६ – छत्रपती शिवरायांचे स्मारक अरबी समुद्रात बांधण्यासाठी पर्यावरण विभागाची परवानगी नाही, या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याचे परिणाम शुक्रवारी सभागृहात उमटले. शुक्रवारी विधानपरिषदेत या मुद्यावर चर्चा सुरू असताना जरी ते ज्येष्ठांचे सभागृह असले तरी मुख्यमंत्र्यांनी याचे उत्तर आधी विधानसभेत द्यावे. या मागणीसाठी शिवसेना-भाजपा आणि मनसेच्या आमदारांनी सभागृहाचे कामकाज सोमवारपर्यंत बंद पाडले. याच मुद्यावर गदारोळ करीत विधानसभेत कामकाज बंद पाडणार्या प्रमुख विरोधी पक्ष असणार्या शिवसेना-भाजपमध्येही मतभेद असल्याचे उघड झाले.
विधानसभेत कामकाज सुरू होताच, आक्रमकपणे ’झालेच पाहिजे’ अशा घोषणा देण्याचा शिवसेना सदस्यांचा प्रयत्न प्रथम भाजपकडून साथ न मिळाल्याने फुसकाच ठरला. पश्नोत्तरानंतर पुन्हा एकदा शिंदेशाही पगड्या घालून शिवसेनेचे काही सदस्य हातात थर्माकोलच्या तलवारी घेत गोंधळ घालू लागले, तेव्हा भाजपकडून त्यांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही.
अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी या गोष्टी ओळखून विरोधी पक्षनेत्यांनी सदस्यांना जागेवर जाण्यास सांगावे असे आवाहन केले. पण खडसे यांच्याकडून ते झाले नाही. कालच या विषयावरून कागदपत्रासह सरकारला धारेवर धरणारा भाजप बघ्याच्या भूमिकेत होता. घोषणाबाजी करीत शिवसेना सदस्य पिठासनावर गेले. संजय गावडे यांनी राजदंड तलवारी प्रमाणे एका हातात धरून घोषणा दिल्या. तेव्हा वातावरण तणावपूर्ण झाले. कामकाज तहकूब करण्यात आले.
पुन्हा बैठक सुरू झाली तेव्हा कामकाज पुकारले जात होते. पण सदस्यांकडून प्रतिसाद दिला जात नव्हता. अखेर कामकाज गुंडाळण्यात आले. दिवसभराकरीता कामकाज
