नागपूर, दि. १६- देशभरातील ४० आयुध निर्माणींच्या भरतीचे मुख्यालय येथील अंबाझरी आयुध निर्माणीत करण्यात आले आहे. त्याअंतर्गत क श्रेणीतील भरतीच्या कर्मचार्यांचा केंद्रीकृत सेल नागपुरात स्थापन करण्यात आला आहे. येत्या १८ मार्चला आयुध निर्माणींचा स्थापनादिवस साजरा होत आहे. त्याची ही भेट अंबाझरीला मिळाली आहे.
सुमारे दोनशे वर्षापूर्वी, १८ मार्च १८०२ ला कोलकाता येथे तोफा तयार करणार्या पहिल्या आयुध निर्माणीची सुरुवात झाली. त्यानंतर देशाच्या विविध भागात आयुध निर्माणीचा विस्तार झाला. अंबाझरी आयुध निर्माणीची सुरुवात ९ मार्च १९६६ ला झाली. विविध तोफा, तोफगोळ्यांचे कवच, फ्युज, अॅसॉल्ट ब्रीज, अॅल्युमिनियम मिश्रण केंद्र येथे आहे. पिनाक रॉकेट तयार करणारी तसेच विविध प्रकल्प एकाच ठिकाणी असलेली ही देशातील सर्वात मोठी आयुध निर्माणी आहे. त्यामध्ये आता या भरती मुख्यालयाची भर पडली आहे.
अंबाझरी आयुध निर्माणीचे अतिरिक्त प्रधान संचालक बी. बी. शर्मा यांनी सांगितले की, क श्रेणीतील कर्मचारी ही आयुध निर्माणीची सर्वात मोठी ताकद आहे. सुमारे ६० ते ७० टक्के कर्मचारी याच श्रेणीतील आहेत. याआधी आयुध निर्माणी भरती मंडळातंर्गत प्रत्येक आयुध निर्माणी स्थानिक स्तरावर भरती करीत होती. आता मात्र भरती प्रक्रिया पारदर्शक व जलद होण्यासाठी केंद्रीकृत सेल नागपुरात स्थापन करण्यात आला आहे. अद्याप या सेलचे काम सुरु झालेले नाही. मात्र रुपरेषा ठरल्यानंतर महत्त्वाचे काम अंबाझरीमध्ये होईल, असेही शर्मा यांनी सांगितले.