विळखा माफियांचा

मध्य प्रदेशात दगड  आणि वाळू माफियांनी किती धुडगूस घातला आहे हे सर्वांना माहीत झाले आहेच पण त्यांनी सरकारी अधिकार्‍यांची हत्या करीपर्यंत मजल मारली आहे. मोरेना येथे पोलीस अधीक्षकांची हत्या करण्यात आली तर पन्ना येथे उपजिल्हाधिकार्‍यांना ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी महाराष्ट्रात झालेल्या सहायक जिल्हाधिकार्‍यांना जाळून मारण्यात आल्याच्या घटनेची आठवण होते. आपल्या सामाजिक जीवनात असे माफियाच अधिक मस्तवाल झाले आहेत. सर्रास बेकायदा कामे चाललेली असतात. सरकारी यंत्रणा त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी ती सारी कामे उघड्या डोळ्यांनी पहात असते. आता मध्यप्रदेश सरकारने या प्रकारातल्या आरोपीला अटक केली आहे. सरकारने असे आरोपी सापडताच त्यांना जेरबंद करण्याचे आदेश दिले आहेत आणि अशा कारवाईच्या आड सरकारचा कसलाही दबाव येणार नाही अशी ग्वाही दिली आहे. महाराष्ट्रात राज्याच्या मुख्य सचिवांनी पोलीस अधिकार्‍यांना पत्र पाठवून दारु माफियांना फार त्रास देऊ नये अशा आदेशच दिला आहे. त्यांनी काही नियमांचा भंग केला तर त्यांना दंड वसूल करून सोडून द्यावे म्हणजे सरकारला जादा उत्पन्न मिळेल आणि या सन्माननीय दारू माफियांना कैदेत वगैरे बसण्याचा त्रास होणार नाही. नाही तरी त्यांना  कैदेत टाकण्याने सरकारच्या तिजोरीला काही फायदा होणार नाही. त्यापेक्षा सरकारचा खर्च वाचवा आणि उत्पन्नात भर टाका. असा हा आदेश काढण्यासाठी या दारूच्या व्यापार्‍यांची सरकारशी काही तरी बोलणी झालीच असणार. शेवटी सरकारला ते आठ हजार कोटीचा महसूल देत आहेत. असे लोक कैदेत पडून कसे चालेल ? या लोकांच्या मदतीने या महसुलात तीस टक्के भर टाकण्याचा सरकारचा मनोदय आहे. एवढी देशसेवा करणारा कोणताही उद्योग दाखवा. अन्य क्षेत्रांत पुढारी, काही माफिया आणि भ्रष्ट पोलीस यंत्रणा मिळून देशाला पूर्ण उद्ध्वस्त करणारे उद्योग चालवत आहेत. त्यातले अग्रगण्य माफिया म्हणजे ड्रग्ज माफिया. महाराष्ट्रात काही जिल्हयात अफूची बेकायदा लागवड होत असल्याच्या बातम्या गेल्या महिन्यात भरपूर गाजल्या. देशात आणि एकूणच जगात राबवल्या जात असलेल्या नशिल्या पदार्थांच्या बेकायदा व्यापाराचे ते पहिले टोक आहे. ही लागवड करणार्‍या शेतकर्‍यांना आपण किती मोठ्या षड्यंत्राचे भाग आहोत याची काही कल्पनाही नाही पण, हे षड्यंत्र लाखो तरुणांच्या जीवाचा बळी घेत आहे आणि अशाच लाखो कुटुंबाची वाताहत करीत आहे. या कारस्थानात अडकलेले लोक केवळ  पैशाच्या मोहाला बळी पडून हे पाप आपल्या माथी घेत आहेत. गेल्या वर्षी  भारतात या मादक द्रव्याच्या सेवनाने  दोन लाख तरुण मरण पावले आहेत. हा विळखा आणखी आवळला जात आहे आणि तो देशाच्या भवितव्याला जाचक ठरणार आहे. आपल्या देशाला सर्वात अधिक मोठा धोका पोचवणारे खरे माफिया आहेत ते नकली नोटा प्रचारात आणणारे. भारताचे चलन चोरट्या पद्धतीने छापून ते भारतात प्रचारात आणण्याचे मोठे कारस्थान पाकिस्तानात चालते. गेली काही वर्षे या मार्गाने  बांगला देशातल्या काही अतिरेकी संघटनांच्या मदतीने पाचशे रुपयांच्या करोडो रुपयांच्या नोटा भारतात आणण्यात आल्या.  आता त्यात हजार रुपयांच्या नोटांची भर पडत आहे. आता या कारस्थानात मलेशिया, दुबई, सिंगापूर, बँकॉक, श्रीलंका या शहरांचा आणि देशांचेही सहकार्य घेतले जात आहे. आग्नेय आशियाही या कारस्थानात सामील झाला आहे. हे भारताच्या  अर्थ व्यवस्थेला मोठे आव्हान आहे. आंध्र प्रदेश, ओडिशा, कर्नाटक, छत्तीसगड आणि झारखंड या राज्यांत या माफियांच्या साम्राज्याने किती  हैदोस घातला आहे हे आता उघड झाले आहे. अलीकडेच खुद्द पंतप्रधानांनीच परदेशांतून आलेल्या पैशातून देशाच्या विकासात अडचणी आणण्याचे प्रयत्न कसे केले जातात याचा गौप्यस्फोट केला आहे. तामिळनाडूतल्या  कुडानकूलम येथील अणु ऊर्जा प्रकल्पाला विरोध करणार्‍या संघटनांना अमेरिकेतून मदत आली असल्याचे पंतप्रधानांनीच सांगितले. या मदतीचे आकडे सरकारनेच जाहीर केले असून  वर्षाभरात एकट्या तामिळनाडूतल्या ३२१८ स्वयंसेवी  संघटनांना अमेरिकेतून १६६३ कोटी रुपये मिळाले असल्याचे केन्द्रीय गृह खात्यानेच म्हटले आहे. परदेशी पैशांवर पोसल्या जात असलेल्या या संघटना देशात धर्मांतराचे प्रयत्न करून समाजात दुही निर्माण करण्याचेही कारस्थान राबवत आहेत. अलीकडे तर देशापुढच्या संकटांत आणखी एका कारस्थानाची भर पडत आहे. आपल्या देशाच्या सीमा फार उघड्या आहेत. त्यातून चोरटा माल आणणे फार सोपे आहे. बिहार, बंगाल आणि पूर्वोत्तर भागातल्या काही राज्यांतून बांगला देश, नेपाळ, म्यानमार, भूतान या देशांत अनेक प्रकारची बेकायदा वाहतूक होत आहे. या मार्गातून औषधी आणि जनावरे यांची वाहतूक फार होते अशा तक्रारी होत्या पण आता त्यात माणसाच्या आवकीची भर पडायला लागली आहे. गेल्या काही  दिवसांत म्यानमार मधून माणसे बेकायदारित्या भारतात येत असल्याचे दिसून आले आहे. बांगला देशातून असे लोक येत होतेच पण आता म्यानमारच्याही लोकांची भर पडत आहे. हा आपल्या सुरक्षा व्यवस्थेला मोठाच धोका आहे.

Leave a Comment