प्रवाशांना दिलासा देणारा रेल्वे अर्थसंकल्प

नवी दिल्ली, दि. १४ – केंद्रीय रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांनी आपल्या कारकिर्दीतील पहिला रेल्वे अर्थसंकल्प सादर करताना नऊ वर्षांनंतर प्रथमच रेल्वे प्रवासभाड्यात वाढ केली आहे. त्रिवेदींनी या अर्थ संकल्पात विविध वर्गातील प्रवासभाड्यात प्रत्येक कि.मी. मागे २  ते ३० पैशांपर्यंतची वाढ केली आहे. महागाईने त्रस्त असलेल्या जनतेला अवाजवी भूर्दंड सोसावा लागणार नाही, याची काळजी घेताना केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी मुंबईकरांनाही दिलासा दिला आहे.
  याशिवाय या अर्थसंकल्पात ७५ नव्या रेल्वेगाड्या सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. तर रेल्वेच्या आधुनिकीकरणावर आत्तापर्यंतची सर्वात मोठी तरतूदही करण्यात आली असून, सुमारे ६० हजार १०० कोटी रूपयांचा निधी याकरिता उपलब्ध करण्यात आला आहे.
  रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांनी बुधवारी संसद प्रांगणात प्रवेश केल्यानंतर त्यांच्याकडे सर्वच पक्षीय नेत्यांच्या नजरा होत्या. काकोडकर आणि पित्रोदा समितीच्या अहवालात रेल्वेच्या आर्थिक प्रकृतीबद्दल व्यक्त झालेली चिंता, अटळ भाडेवाढीची टांगती तलवार, आवश्यक आधुनिकीकरण या पार्श्वभूमीवर दिनेश त्रिवेदींवर त्यांच्याच पक्षश्रेष्ठी तृणमूल काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्या ममता बॅनर्जी यांचाही दबाव असल्याचे बोलले जात होते. बुधवारी त्रिवेदींच्या पोतडीतून काय बाहेर निघते, याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले होते.
  या सगळ्या दडपणाखाली असलेल्या त्रिवेदी यांनी समस्या व उपाय यांचा ताळमेळ घालताना अगदी नाममात्र भाडेवाढ करून लाखो प्रवाशांना दिलासा दिला आहे. एक्सप्रेस आणि मेलच्या शयनयान श्रेणीच्या तिकीटदरात प्रति किलोमीटर मागे ५ पैशांची वाढ करण्यात आली आहे. तर वातानुकुलीत श्रेणीच्या तृतीय दर्जा, खुर्चीयान वातानुकुलीत आणि प्रथम दर्जाच्या तिकीटात प्रति किमी मागे १० पैसे, द्वितीय श्रेणी वातानुकुलीत प्रवासासाठी प्रति किमी १५ पैसे आणि प्रथम श्रेणीच्या वातानुकुलीत प्रवासास प्रति किमी ३० पैसे वाढ करण्यात आली आहे. मुंबईकरांसाठी महत्वाचे म्हणजे उपनगरी व सामान्य द्वितीय श्रेणीच्या रेल्वेगाड्यांच्या प्रवासभाड्यात प्रति किमी अवघ्या २ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. यानुसार चर्चगेट-विरार किवा सीएसटी- कल्याण दरम्यान सध्या आकारल्या जाणार्‍या भाड्यात अवघ्या दीड रूपयाने वाढ होईल.     
  रेल्वेच्या सुरक्षेला आपले सर्वोच्च प्राधान्य असल्याचे त्रिवेदी यांनी सुरूवातीलाच स्पष्ट केले. त्याकरिता लागणार्‍या तंत्रज्ञानाची निर्मिती करण्यासाठी रेल्वेने रिसर्च अॅण्ड डेव्हेलपमेंट कॉर्पोरेशनची स्थापना करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्रिवेदी यांनी जाहीर केले. तर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रेल्वे स्थानकांची निर्मिती व नियमीत देखभालीसाठी इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हेलपमेंट कॉर्पोरेशनची स्थापना केली जाईल.
  दरवर्षी रेल्वे अपघातात बळी जाणार्‍यांच्या संख्येत मोठी वृद्धी झाली असून, देशभरातील रेल्वे फाटके पुढील पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने हटविण्याचा रेल्वे मंत्रालयाचा मानस असल्याचे त्रिवेदी यांनी नमूद केले. सध्या रेल्वेमार्ग अपुरे असल्यामुळे रेल्वे गाड्यांची संख्या वाढविणे कठीण जाते आहे. मात्र विविध राज्यांतील मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन तेथे रेल्वेचे जाळे विस्तृत करण्यासाठी रेल्वे मंत्रालय प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. 
  या अर्थसंकल्पाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे देशातील २०० रेल्वे स्थानके सौरऊर्जेवर आधारीत हरित ऊर्जा प्रकल्पांतर्गत विकसित केली जातील. तर प्रवासी गाड्यांच्या सुमारे २५०० डब्यांमध्ये बायो-टॉयलेट उभारले जाईल. दिवसेंदिवस तीव्र होत जाणारी ऊर्जा समस्या लक्षात घेऊन यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि प. बंगाल राज्यात पवनऊर्जा प्रकल्प राबविले जातील. जम्मू-काश्मीर, ईशान्य भारत आणि नेपाळमध्ये रेल्वेचे विस्तृत जाळे उभारण्याचा संकल्प या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे.
  रेल्वेला सर्वाधिक उत्पन्न देणार्‍या मुंबईकरांची त्रिवेदी यांनी विशेष दखल घेतल्याचे जाणवते. त्यानुसार उपनगरी लोकलसाठी १५०० अतिरिक्त डबे, हार्बर रेल्वेवर सरसकट १२ डब्यांच्या गाड्या, २०१३ सालापर्यंत मुंबई ते पुणे या मध्य रेल्वे मार्गाचे एसी परावर्तन, रेल्वे स्थानकांवर सरकते जिने, हरित स्वच्छतागृहे, पनवेलमध्ये रेल्वे प्रशिक्षण संस्थेची उभारणी, पनवेल-विरार रेल्वेमार्ग, चर्चगेट-विरार उन्नत रेल्वेमार्गांसाठी सर्वेक्षण, मध्य आणि पश्चिम रेल्वे जोडणीची व्यवहार्यता तपासणे आदी आश्वासने यंदा मुंबईकरांना मिळाली आहेत.    
 

Leave a Comment