प्रदेश काँग्रेस – मुंबई काँग्रेसमध्ये ३० मार्च नंतर फेरबदल होणार

मुंबई, दि. १३ मार्च- प्रदेश काँग्रेस पक्षात येत्या ३० मार्च नंतर फेरबदल करण्याचे संकेत नवी दिल्लीतून मिळाले असून एकाच वेळी मुंबई विभागीय अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष पदाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
महानगरपालिका, जिल्हापरिषद निवडणुकांमधील वाईट कामगिरी आणि राजकीय नेत्यांच्या घोटाळ्यांच्या मालिका यामुळे बेजार झालेल्या काँग्रेस पक्षाला नवा स्वच्छ चेहरा देवून नव्या दमाने वाटचाल करण्यासाठी ३० मार्च नंतरची वेळ ठरविण्यात आली आहे. ३० मार्चला संसदेच्या अधिवेशनाचे पहिले सत्र संपणार आहे. त्यावेळी महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाचे कामकाजही संपणार आहे. त्यामुळे राज्यातील पक्ष संघटनेच्या फेरबदलाकडे पक्षश्रेष्ठी लक्ष देणार आहेत. राज्यात गेल्या काही दिवसांपासून घोटाळ्यांच्या चर्चांमुळे काँग्रेस पक्षाची प्रतिमा डागाळली आहे. या गोष्टीचा विचार करून नवा प्रदेशाध्यक्ष निवडला जाणार आहे.
  तत्पूर्वी राज्यसभेच्या दोन रिक्त जागांकरीता ३० मार्च रोजी मतदान होणार आहे. या दोन जागांवर पुन्हा केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख आणि राजीव शुक्ला यांचीच नावे चर्चेत असली तरी निष्ठावंतांकडून शुक्ला यांच्या नावाला विरोध केला जात आहे. त्यामुळे शुक्ला यांना उत्तराखंड किवा उत्तरप्रदेश मधून निवडून आणावे आणि यावेळी राज्यातील एखाद्या नेत्याला संधी द्यावी, असे बोलले जात आहे.
  विलासराव देशमुख यांना पुन्हा राज्यात आणावे आणि राज्यसभेची रिक्त जागा पृथ्वीराज चव्हाण यांना पुन्हा बहाल करावी, असेही प्रयत्न केले जात आहेत. माजी मंत्री रोहीदास पाटील यांनीही राज्यसभेसाठी तयारी चालवली असून राज्यातील प्रदेश कार्याध्यक्ष पदासाठी देखील त्यांच्या नावाचा आग्रह धरला जात आहे. दरम्यान, पक्षश्रेष्ठींनी कलमाडी पाहिजेत की राज्य, हे ठरवावे, असे वक्तव्य पक्षाचेच प्रदेश प्रवक्ता अनंत गाडगीळ यांनी केले आहे. कलमाडी यांनी परस्पर उमेदवारी घोषित करून पक्षाला आव्हानच दिले आहे, असे ते म्हणाले.
  राज्यातील काँग्रेस पक्षात सध्या एका विषयाची खमंग चर्चा केली जात आहे. टू जी स्पेक्त्रम घोटाळ्यामुळे केंद्रातील युपीए सरकार अडचणीत आले. महाराष्ट्रात थ्री के मुळे काँग्रेस पक्ष अडचणीत आला आहे. हे थ्री के कृपाशंकर, कलमाडी, कन्हैयालाल आहेत. असे प्रदेश काँग्रेस मध्येच बोलले जात आहे.

Leave a Comment