प्रकाशसिंह बादल पंजाब मुख्यमंत्रीपदी विराजमान

चंदीगड, दि. १४ मार्च – शिरोमणी अकाली दलाचे नेते प्रकाशसिंह बादल यांनी बुधवारी पंजाब राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण केली. बादल यांनी एक नवा विक्रम स्थापन करीत पाचव्यांदा पंजाब राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. या समारंभाला भारतीय जनता पक्ष, तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी प्रकाशसिंह यांचे पुत्र सुखविदर सिंह यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर भाजपच्या चार मंत्र्यांसह १६ कॅबिनेट मंत्र्यांनी शपथ घेतली.
  कॅबिनेटमध्ये बादल कुटुंबाचे चार सदस्य आहेत. प्रकाशसिंह बादल यांचे जावई आदेश प्रतापसिंह कैरॉन आणि सुखबिरसिंह बादल यांचे मेहुणे विक्रमसिंह मजेठीया यांचाही कॅबिनेटमध्ये समावेश करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवानी व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री प्रफुल्ल पटेल आणि जनता दल युनायटेडचे अध्यक्ष तसेच बिहारचे मुख्यमंत्री उपस्थित होते. यापूर्वी १९७०, १९७७, १९८०, १९९७ आणि २००७ साली प्रकाशसिंह बादल यांनी पंजाबचे मुख्यमंत्रीपद भूषविले होते.
  या विधानसभा निवडणुकीत ११७ जागांपैकी अकाली दल व भाजपच्या युतीने ६८ जागांवर विजय मिळून सत्ता संपादन केली. तर काँग्रेसला केवळ ४६ जागा जिंकता आल्या.

Leave a Comment