दादा सापडले पण…..

जळगावचे दादा पोलिसांच्या जाळ्यात सापडले. आदर्शचे दादा कधी सापडणार ? असा प्रश्न विचारला जात आहे. कारण कालच उच्च न्यायालयाने सीबीआयला सरळ सरळ सवालच केला आहे. सीबीआयने आदर्शचे अनेक पुरावे हाती सापडले असल्याचा दावा केला होता. आदर्श सोसायटीत ९ जणांचे बेकायदा फ्लॅट असल्याचे आढळले असल्याचेही न्यायालयाला सांगितले आहे. मग यावर न्यायालयाचा साहजिकच प्रश्न आहे की, पुरावे आहेत तर अटक का नाही ? प्रश्न साहजिक आहे पण उत्तर फार अवघड आहे. कारण सीबीआय ही यंत्रणा केन्द्र सरकारच्या डोळ्याच्या इशार्‍यावर चालते. या यंत्रणेला तशा सूचना दिलेल्या असणार. आपली माणसे आहेत. दमाने काम घ्या. न्यायालयाला विसर पडेपर्यंत विलंब लावा आणि शक्यतो त्यांना हात न लागेल असे बघा. ए.राजा यांच्या प्रकरणात असेच झाले होते. आता आदर्श प्रकरणात तसेच होत आहे. सारा साटेलोट्याचा मामला आहे. अण्णा हजारे यांनी लोकपालांच्या नियुक्तीचा आग्रह धरताना सीबीआयला सरकारच्या तावडीतून मुक्त करण्याची मागणी केली आहे ती यामुळेच होय.
    अण्णांचे हे म्हणणे मान्य झाले असते तर केन्द्रातले निम्मे मंत्रिमंडळ कारागृहात पडले असते. पण ते तसे पडत नाही आणि सरकार लोकपाल विधेयक काही आणत नाही. ते नाना प्रकारचे बहाणे सांगून टाळाटाळ करते. म्हणूनच अरविंद केजरीवाल यांनी म्हटले होते की, या संसदेत निम्मे लोक गुन्हेगार असतील तर ते आपल्याला सरळ कारागृहात पाठवणारा कडक कायदा कसा करू शकतील ? आता उत्तर प्रदेशात निवडणुका झाल्या आणि मुलायमसिंह यांचा मुलगा मुख्यमंत्री झाला याचे कितीतरी कौतुक सुरू आहे पण याही विधानसभेत ३३ टक्के लोक अशाच संशयास्पद पार्श्वभूमीचे आहेत आणि ६६ टक्के लोक भल्या बुर्‍या मार्गांनी करोडपती झालेले आहेत. तिथे झालेला सनराईज (सन म्हणजे मुलगा आणि राईज म्हणजे उगवणे) कितपत लोकांना न्याय देणारा ठरणार आहे याबाबत आताच शंका यायला लागल्या आहेत. जळगावचे दादा तर आत पडले आहेत आणि त्यामुळे या चर्चेला फार गती आली आहे. महाराष्ट्रात अनेक मंत्री संशयाच्या जाळ्यात सापडले आहेत आणि आता आता ही मालिका लांबत चालली आहे. सुरेश जैन प्रकरणाच्या निमित्ताने राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांनाही अटक करावी, अशी मागणी विरोधी पक्षांनी लावून धरली आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या अडचणीत वाढ होणार आहे.         सुरेशदादा जैन यांना काल अटक करण्यात आली. त्यांच्या या प्रकरणाची गेल्या काही दिवसांपासून जी चौकशी सुरू होती तिचा वेध घेतला असता अशा प्रकारची कारवाई कधी ना कधी होणारच, असे दिसायला लागले होते. सुरेश जैन हे अतिशय हुशार राजकारणी आहेत आणि राजकीय जीवनामध्ये त्यांच्या भ्रष्टाचाराची चर्चा फार होत आलेली आहे. चर्चा करणार्‍याला पुरावे लागत नाहीत. परंतु एखाद्या व्यक्तीची अचानकपणे वाढणारी मालमत्ता, त्याचे राहणीमान, खाजगीतली चर्चा आणि कोठेही सहीमध्ये न अडकता केलेली बेकायदा कामे यावरून हा माणूस भ्रष्ट असणारच असा लोकांचा ग्रह झालेला असतो. असे चतुर नेते पैसा खातात परंतु सहीत अडकत नाहीत. मात्र आपले काहीच वाकडे होणार नाही या भ्रमात राहून कोठे तरी चूक करून बसतात आणि त्यांच्या गळ्याभोवतीचा फास आवळला जायला लागतो. सुरेश जैन यांनी अशी भरपूर खबरदारी घेतली होती. परंतु आर्थिक व्यवहारामध्ये त्यांनी काही काळजी घेतली नाही त्यामुळे ते सापडले आहेत. सुरेशदादा जैन यांच्यासारख्या अशा नेत्यांना आपल्यावरचे किटाळ टळावे म्हणून राजकारणात फार  उड्या माराव्या लागतात आणि सुरेश जैन यांनी तशा मारलेल्याही आहेत. परंतु अशा उड्या मारताना सर्व पक्षात मित्र निर्माण करण्याच्या ऐवजी सर्वच पक्षात शत्रू मात्र निर्माण करून ठेवलेले आहेत. त्याचा परिणाम होत आहे.
    महाराष्ट्रात तर बर्‍याच लोकांना हे सुरेश जैन आता नेमके कोणत्या पक्षात आहेत हेच लक्षात येत नाही. पण आता ते शिवसेनेत आहेत. त्यांनी काँग्रेस सोडून शिवसेना आणि शिवसेना सोडून पुन्हा काँग्रेस, पुन्हा शिवसेना असा तीन-चार वेळा प्रवास केलेला आहे. आता ते शिवसेनेत असले तरी आणि त्यांच्यावर कारवाई होत असली तरी त्यांच्या या कारवाईचा त्रास काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा होणार आहे. १९९९ साली जळगाव नगरपरिषद असताना त्यांनी तिथे झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करून घरे बांधण्याची योजना आखली. जळगावमध्ये सुद्धा अशी योजना आखावी ही कल्पना त्यांनी नगरपालिकेच्या गळी उतरवली. नगराध्यक्ष कोणीही असला तरी जळगाव नगरपालिकेचे कर्तेधर्ते सुरेश जैनच असतात. त्यामुळे तिथे दर वर्षाला बदलत जाणार्‍या नगराध्यक्षांनी त्यांची कल्पना मान्य केली आणि साधारण १६० कोटी रुपयांची ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी हुडकोकडून कर्ज घेतले.     मुळात ही योजना नगरपालिकेला राबवता येते की नाही, हाच वादाचा मुद्दा आहे. परंतु करोडो रुपयांच्या आमिषाने सर्वांनीच हा मुद्दा नजरेआड केला. त्याचा परिणाम आता भोगावा लागत आहे.

Leave a Comment