तुर्कीपासून दूर रहा; इस्त्रायलचा आपल्या नागरिकांना सल्ला

जेरुसलेम, दि. १४ मार्च – तुर्कीमध्ये राहणार्‍या इस्त्रायली नागरिकांवर हल्ला होणार असल्याची माहिती गुप्तचर विभागाने दिल्यानंतर इस्त्रायलने आपल्या नागरिकांना तुर्कीपासून दूर राहण्याचे सांगितले आहे. पंतप्रधानांच्या दहशतवाद विरोधी कार्यालयाने मंगळवारी हा सावधानतेचा इशारा जाहीर केला. तुर्कीमधील दहशतवादी संघटना येत्या काही दिवसांत तेथील इस्त्रायली व इतर ज्यू नागरिकांवर हल्ला करण्याची योजना आखत आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. गेल्या महिन्यात भारत व थायलंडमध्ये इस्त्रायलच्या दूतावासाच्या जवळ झालेल्या हल्ल्यांसाठी इस्त्रायलने इराणवर आरोप केला होता. भारतात झालेल्या हल्ल्यात इस्त्रायली राजदूताची पत्नी जखमी झाली होती.
काही वर्षांपूर्वी तुर्की व इस्त्रायल मित्र राष्ट्र होते. मात्र तुर्कीने इस्त्रायल ऐवजी अरब आणि मुस्लीम जगाशी आपले नातेसंबंध बळकट केल्याने या दोन राष्ट्रात वाद निर्माण झाला. एकेकाळी इस्त्रायली प्रवाशांसाठी तुर्की हे मोठे आकर्षण होते. मात्र त्यांच्या संबंधात तणाव निर्माण झाल्यामुळे सध्या इस्त्रायली पर्यटकांचे येथे येण्याचे प्रमाण घटले आहे.

Leave a Comment