उपकर्णधारपदी निवड झाल्यामुळे जबाबदारी वाढली- विराट कोहली

मीरपूर, दि. १४ मार्च- ऑस्ट्रेलिया दौर्‍यात भारतीय संघाची एकत्रित कामगिरी अतिशय सुमार असली तरी दिल्लीचा युवा फलंदाज विराट कोहलीने तेथे आणि नंतर आशिया कपमध्ये आपली छाप पाडली आहे. विराटच्या कामगिरीतील सातत्य पाहून भारतीय क्रिकेट संघाचे उपकर्णधारपद त्याच्याकडे सोपविण्यात आले आहे. ही जबाबदारी त्याच्यावर सोपविल्यानंतर मंगळवारी श्रीलंकेविरोधात जोरदार फटकेबाजी करीत विराटने भारतीय संघाला मोठा विजय मिळवून दिला. 
उपकर्णधार पद मिळणे हा आपला सन्मान आहे. वयाच्या २३ वर्षी आपल्याला हा सन्मान मिळेल अशी आशा नव्हती. तसेच उपकर्णधारपदामुळे आपल्यावरील जबाबदारी वाढली आहे आणि आपण त्याला परिपूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया विराटने आशिया कपमध्ये मिळविलेल्या पहिल्या विजयानंतर दिली.
विराटने यावेळी आपला संघ सहकारी गौतम गंभीरचे कौतुक केले, आम्ही दोघेही अनेकदा दिल्ली संघासाठी एकत्र खेळलो आहे. त्यामुळे आमच्यातील ताळमेळ चांगला आहे. मंगळवारी आम्ही जी मोठी भागीदारी रचली ती याच बळावर. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात या दोघांनीही तिसर्‍या विकेटसाठी २०५ धावांची भागीदारी रचली. त्यामुळेच भारतीय संघाला श्रीलंकेसमोर आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. कारकिर्दीच्या पहिल्या ८० डावात १० शतके ठोकणारा विराट हा पहिला फलंदाज आहे. याआधी ब्रिटनच्या गॉर्डन ग्रिनीज  याने ९९ डावात १० शतके ठोकली होती.

Leave a Comment