पाच महानगरपालिकांच्या निवडणूका घोषित

मुंबई, दि. १३ – मुंबईसह दहा महानगरपलिकांच्या निवडणुकांचा धुरळा खाली बसत नाही तोच राज्य निवडणूक आयोगाने पाच महानगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रम मंगळवारी जाहीर केला. भिवंडी-निजामपूर, मालेगाव, चंद्रपूर, परभणी तसेच लातूर महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा तर नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या एका रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी जाहीर केला. त्यानुसार रविवार १५ एप्रिल रोजी मतदान होणार असून दुसर्‍या दिवशी १६ एप्रिलला मतमोजणी होणार आहे.
  चंद्रपूर, लातूर, परभणी महापालिकेची ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक आहे. लातूर आणि चंद्रपूर महानगरपालिकेची मुदत २४ एप्रिल २०१२ तर भिवंडी-निजामपूरची १२ जूनला संपत आहे. परभणी महानगरपालिकेची मुदत ३० एप्रिल ला तर मालेगावची १४ जून ला संपत आहे. नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. १३ च्या सदस्याने राजीनामा दिल्याने तेथील जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे या जागेसाठी पोटनिवडणूक १५ एप्रिलला होत आहे.
   यासाठी २० ते २७ मार्च पर्यंत नामनिर्देशन पत्र स्वीकारली जाणार असून २८ मार्चला त्यांची छाननी होणार आहे. नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची अंतिम तारीख ३० मार्च आहे. तर मतदान १५ एप्रिल ला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत होईल. भिवंडी-निजामपूर- मतदारसंख्या- ४५९११५, मालेगाव- ३६७३७१, लातूर- २५०३७६, चंद्रपूर-२३६९९५ आणि परभणी -२०३४४९ इतकी आहे

Leave a Comment