आरोप सिध्द झाल्यास मृत्यूदंडाची शिक्षा – पेनेटा

वॉशिंग्टन दि. १३ – अफगाणिस्तानमधील कंदहार परिसरात १६ निष्पाप नागरिकांची हत्या करणारा अमेरिकन सैनिक दोषी असल्याचे सिध्द झाल्यास त्याला मृत्यूदंडाची शिक्षा होईल, असे अमेरिकेचे सुरक्षा सचिव लिओन पेनेटा यांनी मंगळवारी सांगितले. अटक करण्यात आलेल्या संशयितावर महिला व लहान मुलांसह इतर नागरिकांची हत्या करण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. अमेरिकन सैनिकांच्या अशा कृत्यामुळे अफगाणिस्तानात अमेरिका विरोधी मत तयार होत आहे. त्यामुळे अफगाणिस्तानातील इतर अमेरिकी सैनिकांना त्रास होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 
या सैनिकाची ओळख अद्याप पँटागॉनद्वारे जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र तो वॉशिंग्टन बेसमधील सैनिक असल्याचे समोर आले आहे. या सैनिकाला २०१० साली इराकमध्ये अपघात झाला होता. तेव्हापासून त्याला मेंदूचा विकार जडला असून, त्याच्या कौटुंबिक जीवनातही तणाव असल्याचे पेनेटा म्हणाले. मानसिक तणावामुळेही त्याने असे कृत्य केले असावे, असा तर्कही या घटनेनंतर दिला जात आहे.

Leave a Comment