यंदा देशाचा विकास दर ८ ते ९ टक्के राहील – राष्ट्रपती

नवी दिल्ली, दि. १२ – जगभरात मंदीचे सावट असून देखील देशातील वाढत्या उद्योग धंद्यामुळे व सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे भारताचा विकास दर यंदा ८ ते ९ टक्यांच्या दरम्यान राहील, असे प्रतिपादन देशाच्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी सोमवारी केले. अर्थसंकल्पीय सत्राच्या सुरुवातीला केलेल्या भाषणात त्यांनी आपला देश चांगली प्रगती करत असल्याचे सांगितले.
   केंद्र सरकारने आपला निम्मा कार्यकाळ पूर्ण केला आहे. या दरम्यान सरकारने अनेक चांगली विधेयके आणली. सर्वांना भोजन मिळण्याच्या संकल्पनेतून अन्न सुरक्षा विधेयक आणले गेले. तसेच संसंदेत लोकपालासह अनेक महत्वाची विधेयक सादर करण्यात येणार आहेत. काळ्या पैशा संदर्भात सरकारने योग्य पाऊले उचलली आहेत. परदेशात असलेले काळे धन परत आणण्यासाठी विविध देशांशी बोलणे सुरु आहे. साखळी पध्दतीने त्यावर काम करण्यात येत आहे. आर्थिक विकास दराबरोबर कृषी विकास दराचे लक्ष्य चार टक्के निर्धारित करण्यात आले आहे, असे पाटील यांनी सांगितले.
  देशातील गरिबी व निरक्षरता दूर करण्यासाठी प्राथमिक स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहे. देशातून पोलिओचे उच्चाटन झाले ही आरोग्य क्षेत्रातील सर्वात मोठी उपलब्धी आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशनने प्रभावी कामगिरी केली असून देशातील एक कोटी महिलांना याचा लाभ मिळाला आहे. तसेच देशातील ६० कोटी कुटुंबियांना आरोग्य विम्याचा लाभ मिळवून देण्यात आला आहे, असे त्या म्हणाल्या.
  भारताची निर्यात वाढली असल्याने देशाला आर्थिक स्थेर्य मिळत आहे. २० लाख लोकसंख्यांच्या शहरांत मेट्रो रेल्वे प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे. पर्यंटन क्षेत्रात सरकारने १२ टक्के विकास दराचे लक्ष्य ठेवले आहे. देशातील वाढत्या उर्जेची गरज लक्षात घेता अणु प्रकल्प महत्वाचे असून त्यांच्या सुरक्षेत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. दहशतवादाशी दोन हात करण्यासाठी पाकिस्तानशी संबंध अधिक बळकट करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. वेळेवर कर्ज फेडणार्‍या शेतकर्‍यांना कर्जात ३ टक्क्यापर्यंतची सूट देण्यात येणार आहे. देशात रोजगार वृध्दी होण्यासाठी परकीय गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यात येईल, असे त्या म्हणाल्या.

Leave a Comment