आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप सत्तेवर येणे कठीण – संघ

नवी दिल्ली, दि. १२ – देशातील पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची कामगिरी पाहता आगामी २०१४ मध्ये होणार्‍या लोकसभा निवडणुकीत भाजप सत्तेवर येणे कठीण असल्याची मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सोमवारी व्यक्त केले आहे. काँग्रेस पक्षाचा प्रभाव कमी असलेल्या उत्तर प्रदेशात भाजपच्या कमकुवत कामगिरीच्या पार्श्वभूमीवर संघाने आपल्या ‘ऑर्गनायजर’ या मुखपत्रातून भाजपला झोडपले आहे. मात्र, यावर संघाने माघार घेत मुखपत्रात व्यक्त केलेले मत हे संपादकाचे वैयक्तिक मत असल्याचे सांगितले.
 उत्तर प्रदेशात भाजपच्या कार्यकर्त्यांपेक्षा नेत्यांची संख्या जास्त असून त्यावर भाजपने विचार केला पाहिजे, असे संघाने म्हटले आहे. या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ४०३ जागांपैकी भाजपला फक्त ४७ जागांवर विजय संपादन करण्यात यश आले. २००७ सालच्या तुलनेत यावेळी चार जागांचे नुकसान झाले आहे. उत्तर प्रदेशाच्या निकालांवर भाजपला गहन विचार करुन वेळीच योग्य उपाय शोधण्याची गरज आहे, नाही तर २०१४ साली होणार्‍या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला सत्तेवर येणे कठीण होईल, असे ‘ऑर्गनायझर’मध्ये म्हटले आहे.
  उत्तर प्रदेशात काँग्रेसने आडकाठी आणल्याने भाजपला जनतेशी पुरेसा संपर्क साधता आला नाही. याचमुळे गेल्या  दशकात भाजपचे निम्मे मतदार फोडले गेले आहेत. भाजपने सिध्दांत व नेत्यांच्याप्रती लोकांची विश्वसनीयता निर्माण केल्यास त्यांना पुन्हा जनमतावर प्रभाव पाडण्यास यश मिळेल, असा सल्ला संघाने यावेळी दिला.

Leave a Comment