
कंदहार, दि. १२ – अमेरिकेच्या सैनिकाने रविवारी केलेल्या बेछूट गोळीबारानंतर कंदहार परिसरात तणावाचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे या ठिकाणी अमेरिकन सैनिकांना सावध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच अफगाणिस्तानात राहणार्या अमेरिकन नागरिकांनाही सावधान राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
एका अमेरिकन सैनिकाने येथे केलेल्या गोळाबारात १७ निष्पाप नागरिक ठार झाले तर ५ जण जखमी झाले होते. या घटनेनंतर येथील लोकांमध्ये अमेरिकन सैनिकांबद्दल असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे लोकांद्वारे सैनिकांवर प्रतिहल्ला होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या घटनेनंतर अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधून झालेल्या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. अमेरिकेचे संरक्षण मंत्री लिओन पेनेटा यांनी घटनेची सविस्तर माहिती घेतली असून दोषी सैनिक रविवारी पहाटे ३ वाजता छावणीतून बाहेर पडला असल्याचे त्यांनी सांगितले.