एनसीटीसीला काँग्रेसचे सरकार नसलेल्या राज्यांचा विरोध

नवी दिल्ली, दि. १२ – गुजरात, बिहार आणि छत्तीसगढ या काँग्रेसचे सरकार नसलेल्या राज्यांनी पुन्हा एनसीटीसीला विरोध दर्शविला आहे. राष्ट्रीय दहशतवाद विरोधी केंद्राच्या (एनसीटीसी) स्थापनेबद्दल असलेला वाद संपुष्टात आणण्यासाठी सोमवारी केंद्रीय सचिव आर. के. सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राज्यांतील पोलिस महासंचालक आणि मुख्य सचिवांची बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत सदर राज्यांच्या प्रतिनिधींनी एनसीटीसी कडाडून विरोध केला. 
या राज्यांतील प्रतिनिधींनी एनसीटीसी राज्यातील पोलिस दलाच्या कामात दखल देत असल्याचा मुद्दा मांडत विरोध केला. एनसीटीसीच्या स्थापनेनंतर दहशतवाद विरोधी कारवायांमध्ये पोलिसांची भूमिका कमी होणार आहे. गुप्तचर संघटना आपले काम करीत आहे. त्यामुळे नविन संघटनेला अटकेची सूट देणे योग्य नाही, असा मुद्दा विरोध करणार्‍या प्रतिनिधींनी मांडल्याचे सूत्रांनी सांगितले. या बैठकीत दहशतवाद विरोधी पथकाच्या प्रमुखांनीही हजेरी लावली होती.
  ओडीसा राज्याचे मुख्यमंत्री नविन पटनाईक व तामिळानाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग  यांच्याकडे सदर विषयासंदर्भात सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक बोलविण्याची मागणी केली आहे. एनसीटीसीच्या स्थापनेने भारताच्या सांघिक बनावटीला तडा जाईल, असे सांगत काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी याला आपला विरोध दर्शविला होता