कापसावरील निर्यातबंदी त्वरित उठवा – भाजप नेत्यांची मागणी

यवतमाळ, दि. १० – केंद्रातील काँग्रेस सरकारने कापूस निर्यातीवर बंदी घालण्यासंदर्भात घेतलेला निर्णय अतिशय दुर्दैवी असून यामुळे शेतकर्‍यांपुढे नवीन पेच निर्माण झाला आहे. केंद्र शासनाने कापूस निर्यातबंदी ताबडतोब उठवावी अन्यथा कापूस उत्पादकांच्या वाढत्या आत्महत्यांना केंद्र शासन जबाबदार राहील, असा इशारा युतीच्या खासदार भावना गवळी, खासदार हंसराज अहिर, आमदार संजय राठोड यांनी दिला आहे. तसेच या प्रश्नावर संसदेत चर्चा करणार असल्याचे या नेत्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. १२ तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात येणार असल्याची माहिती हंसराज अहिर यांनी दिली.
‘काँग्रेसचा हात आम आदमीके साथ’ असा नारा देत सतत दुसर्‍यांदा केंद्रात सत्तेत आलेले युपीए सरकार खरेच आम आदमीच्या हिताचे निर्णय घेत आहे काय, हा प्रश्न सर्व सामान्यांना पडावा असे निर्णय अलिकडच्या काळात घेतले आहेत. कापूस निर्यातबंदीचा निर्णय त्यांचेच द्योतक आहे. त्यामुळेच शेतकर्‍यांचे हित बाजूला सारून कापसावर प्रक्रिया करणार्‍या गिरणी मालकाचे हित केंद्र शासनासाठी महत्त्वाचे ठरले आहे, अशी टीका त्यांनी केली.