सुविधांबाबत विद्यापीठातील विद्यार्थी उदासीन

पुणे, दि.११ – पुणे विद्यापीठातर्फे तब्बल आठ कोटीहून अधिक रूपये खर्च करून अत्याधुनिक सुविधा देणारे‘विद्यार्थी केंद्र ’उभारले जाणार आहे. मात्र हे केंद्र कसे असावे यासंदर्भातील स सूचना देण्याबाबत विद्यार्थी उदासीन आहेत. विद्यार्थ्यांना त्यांच्यासाठी केल्या जाणार्‍या सुविधांविषयीच काळजी नाही. अशी खंत विद्यापीठातील अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे.
पुणे विद्यापीठाचा उल्लेख नेहमी पंचतारांकित विद्यापीठ असाच केला जातो. त्यामुळे विद्यापीठातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत या भूमिकेतून विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ.संजय चहांदे यांनी पुढाकार घेवून विद्यापीठात अत्याधुनिक सेवा देणारे विद्यार्थी केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला. या केंद्रात कोणत्या सुविधा दिल्या जाणार आहेत. या विषयाची माहिती देण्यासाठी  विद्यापीठाच्या  व्यवस्थापन  विभागाच्या सभागृहात कार्यक्रमाचे  आयोजन  करण्यात आले होते. या केंद्रात आणखी कोणत्या गोष्टींचा समावेश करावा या विषयी सूचना मांडणे अपेक्षीत होते. मात्र या कार्यक्रमास विद्यापीठातील केवळ तीन विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. असेही अधिकार्‍यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्‍या सुविधा चांगल्या असाव्यात अशी मागणी केली जाते. मात्र आणखी कोणत्या सुविधा आवश्यक आहेत. हे सांगण्यासाठी विद्यार्थी पुढे येत नाहीत. विद्यार्थ्यी केंद्रात ओपन थीएटर, स्टेशनरी शॉप, बार्बर शॉप, मेडीसीन शॉप, भारतीय व परदेशी खाद्य वस्तूंचे हॉटेल्स आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या विषयीची माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र काही विद्यार्थ्यांनी संकेतस्थळाला भेट देवून विद्यार्थी केंद्रात दिल्या जाणार्‍या सुविधा परिपूर्ण आहेत अशी प्रतिक्रीया दिली आहे. असेही अधिकारी म्हणाले.
—————————————

Leave a Comment