केंद्राच्या चुकीच्या धोरणाने दूध उत्पादक शेतकरी देशोधडीला स्वाभिमानी शेतकी संघटनेचा आंदोलनाचा इशारा

अहमदनगर, दि. १० – केंद्र सरकारने दूध आणि दुधापासून तयार होणार्‍या दुग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीवर बंदीसारखे चुकीचे निर्णय घेतल्याने राज्यातील दूध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. काही ठिकाणी कर्जबाजारीपणामुळे दूध उत्पादक शेतकरी तर देशोधडीला लागले आहेत, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकारी गुलाब डेरे यांनी केला आहे. केंद्र सरकारने येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दूध व्यवसायाबाबतच्या धोरणात योग्य बदल केले नाहीत तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली दूध उत्पादक शेतकरी संपूर्ण राज्यभर धरणे आंदोलन करतील, असा इशारा डेरे यांनी दिला आहे.
डेरे म्हणाले की, राज्यात दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या दुधाला चांगला भाव मिळत असताना, केंद्र सरकारने दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीवर बंदी लागू केल्याने दुधाचे भाव कमी झाले आहेत. तसेच महाराष्ट्रातील दुधाला कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजराथ, मध्यप्रदेश, दिल्ली यांसारख्या राज्यांमध्ये मोठी मागणी असताना केंद्र सरकारने दुधाची पावडर आयात करण्याचा निर्णय घेतल्याने बाहेरील राज्यांमधून असलेली ही मागणी कमी झाली असल्याने दूध उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. दिवसेंदिवस महागाई वेगाने वाढत आहे. त्यामुळे शेती व दूध व्यवसायासाठी पतसंस्था, सहकारी बँकांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे शेतकर्‍याला मुश्किल झाले आहे. अशा स्थितीत संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना दूध व्यवसायातून अधिक मदत मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांचा फटका शेतकर्‍यांना बसला आहे, असा आरोप करून डेरे म्हणाले, येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्र सरकारने दूध धोरणाचा योग्य विचार न केल्यास संपूर्ण राज्यभर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या वतीने प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल.

Leave a Comment